महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे पोलिसांना गुंगारा देऊन जात असताना धक्का लागून एक महिला पोलीस कर्मचारी पडल्याची घटना घडली होती. या प्रकरणानंतर संदीप देशपांडेंवर गुन्हा दाखल करून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू होता. त्यानंतर न्यायालयाने संदीप देशपांडे यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला. मात्र, संदीप देशपांडेची पोलीस कोठडी मागणाऱ्या पोलिसांना न्यायालयाने झापले आहे.
पोलिसांनी संदीप देशपांडे यांची कोठडी मागताच हा सर्व प्रकार काल्पनिक असून हे प्रकरण कोणत्याही तथ्यावर आधारित नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. आरोपीच्या कोठडीसाठी ठोस कारण नाही. देशपांडे आणि धुरी यांचा जाणीवपूर्वक इजा पोहचवण्याचा हेतू नव्हता, असे सांगून न्यायालयाने पोलिसांना खडसावलं आहे.
न्यायालयाच्या या निर्णयानंतर ही पोलिसांना नसून सरकारला चपराक असल्याचे संदीप देशपांडे म्हणाले आहेत. राज्य सरकारच्या दबावाखाली पोलीस काम करत होते. चुकीची कलम लावण्यात आल्याचा आरोप संदीप देशपांडे यांनी केला आहे. न्यायालयावर विश्वास असून आमचा कोणालाही धक्का लागला नसल्याचे संदीप देशपांडे म्हणाले.
काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा पार पडल्यानंतर भोंगा प्रकरणावरून आंदोलन तीव्र झाले होते. दरम्यान पोलिसांनी मनसे नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली होती. तेव्हा संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना पोलिस पकडायला गेले असताना हा प्रकार घडला होता.