गेल्या दीड वर्षांत कारभाराचा उडालेला बोजवारा, कायदा सुव्यवस्थेचे निघालेले धिंडवडे, दोन मंत्र्यांना द्यावा लागलेला राजीनामा, वसुलीचे झालेले आरोप या सगळ्या पार्श्वभूमीवर निवडणुकांना सामोरे जाण्यापेक्षा त्या पुढे ढकलण्याची शक्कल महाविकास आघाडीने लढविली आहे का, अशी शंका घेण्यास वाव आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या आड मुंबईसह जवळपास १८ महानगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची सूचना ठाकरे सरकारच्या वतीने महाराष्ट्र निवडणूक आयोगाला केली जाणार असल्याचे बोलले जाते. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक पुढील वर्षी होणार आहे.
गुरुवारी राज्य सरकारने कॅबिनेट बैठकीत या विषयाची चर्चा केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य अधिकारी आणि टास्क फोर्सचे सदस्य राज्य निवडणूक आयोगाकडे यासंदर्भात चर्चा करणार आहेत.
राजेश टोपे यांनी म्हटले आहे की, आम्ही निवडणूक आयोगाशी चर्चा करून तिसऱ्या लाटेसंदर्भात त्यांना माहिती अवगत करून देऊ. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था असल्यामुळे आम्ही या निवडणुका पुढे ढकलण्याबाबत शिफारस करू. अंतिम निर्णय अर्थातच त्यांचा राहील.
ओबीसींना राजकीय आरक्षणाच्या बाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय यायचा असल्यामुळेदेखील या निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जाणार आहे. टोपे म्हणाले की, निवडणुका जाहीर झाल्या तर कोरोनाच्या काळात प्रचारदौरे आयोजित करणे कठीण होणार आहे. त्यामुळे निवडणुका पुढे ढकलणेच योग्य होईल.
हे ही वाचा:
अफगाणिस्तानच्या मंत्र्यावर काय आली ही वेळ?
मैसूर महापालिकेत कमळ फुलले! पहिल्यांदाच भाजपाचा महापौर
लीड्स कसोटीत इंग्लंड मजबूत स्थितीत
जून महिन्यात राज्य सरकारने निवडणूक आयोगाला विनंती करून पाच जिल्हा परिषदांच्या पोट निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. त्याआधी, पंढरपूरला झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या समाधान औताडे यांनी भारत भालके यांचे पुत्र भगिरथ भालके यांच्यावर दणदणीत विजय मिळविला होता. या निकालानंतर महाविकास आघाडीचे धाबे दणाणले आणि त्यांनी इतर पोटनिवडणुकाही कोरोनाचे कारण देत पुढे ढकलल्याची चर्चा होती. आता पालिका निवडणुकाही त्याच कोरोनाचे कारण पुढे करत नंतर घेण्याची तयारी ठाकरे सरकार करत आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे.