किमान समान कार्यक्रम आखल्यानंतरही महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षात रोज उठून आरोप प्रत्यारोप होत असतातच, आता एका पक्षातील कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात घेताना समन्वय असावा असे महाविकास आघाडीला वाटू लागले आहे. त्यातून एक समन्वय समिती अस्तित्वात आल्याचे कळते. या समन्वय समितीच्या माध्यमातून आता कार्यकर्ते पक्षात घेतले जातील. शिवसेना नेते सुभाष देसाई, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात ही समिती काम करणार आहे. काँग्रेसच्या स्वबळाची भाषा करणारे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेच स्वतः या समितीचा भाग असणार आहेत.
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मध्यंतरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची फोडाफोडी होत असल्याची तक्रार केली होती. याआधीही शिवसेनेचे कार्यकर्ते, नगरसेवक फुटून राष्ट्रवादीत गेल्याची घटना घडली होती. एकमेकांचे कार्यकर्ते फोडले जात असल्याने आघाडीत नाराजी आहे. एकमेकांचे कार्यकर्ते न फोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, हा गोंधळ अधिक वाढू नये म्हणून शेवटी तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांचा समावेश असलेली समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे.
शिवसेना नेते सुभाष देसाई, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या समितीत असणार आहेत. हे तिन्ही नेते शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षात कार्यकर्त्यांना प्रवेश देतांना एकमेकांना विश्वासात घेणार आहेत. एकमेकांना विश्वासात घेऊनच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.
हे ही वाचा:
एलआयसीचा आयपीओ डिसेंबर महिन्यापर्यंत?
कोरोना पाठोपाठ देशात झिकाचा अलर्ट
… तर शनिवारी-रविवारीही दुकानं उघडी ठेवणार
विदर्भातील तांदूळ घोटाळ्याचे धागेदोरे वरपर्यंत
तर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते फोडण्यासाठी पूर्ण परवानगी आहे, पण शिवसेनेला हात लावायचा नाही असे ठरल्याचे सांगितले होते. सरकार स्थापन होत असताना एकमेकांचे कार्यकर्ते फोडायचे नाहीत असे ठरले होते का, असा प्रश्न हसन मुश्रीफ यांना विचारण्यात आला. त्यावर मुश्रीफ यांनी हे उत्तर दिले.