राजकीय रक्तपाताचा क्रुर चेहरा लाभलेल्या केरळमध्ये पुन्हा एक नवा राजकीय हल्ला समोर आला आहे. भारतीय जनता पार्टीच्या नेत्या शोभा सुरेंद्रन यांच्या प्रचारफेरीवर कम्युनिस्ट कार्यकर्त्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जखमी झाले आहेत. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केरळमधील कझाकुट्टम भागातील वातावरण चिघळले आहे.
भारतात सध्या निवडणुकांचा माहोल सुरु आहे. आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू आणि पुदुचेरी अशा पाच विधानसभांसाठी राजकीय पक्षांनी आपली कंबर कसली आहे. डाव्यांचा गड मानल्या जाणाऱ्या केरळमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी भारतीय जनता पार्टी प्रयत्नशील आहे. भाजपाचे नेते, कार्यकर्ते जोरदार प्रचाराला लागले असून यातीलच एक भाजपा नेत्या म्हणजे शोभा सुरेंद्रन. शोभा सुरेंद्रन या कझाकुट्टम विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार आहेत.
निवडणूक विजयाच्या दृष्टीने सुरेंद्रन या आक्रमक प्रचार करत आहेत. याचाच एक भाग म्हणून सुरेंद्रन आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची एक प्रचारफेरी सुरु होती. त्यावेळी तिथून कट्टरतावादी डावे कार्यकर्ते जात होते. ‘डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया’ या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या युवक आघाडीचे ते कार्यकर्ते होते. भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराची प्रचारफेरी आणि त्याला मिळणारा नागरिकांचा प्रतिसाद बघून त्या कट्टरतावादी कार्यकर्त्यांचा पारा चढला. भाजपाला मिळणारे जनसमर्थन त्यांना धोक्याची घंटी वाटली. पण एवढ्या लोकांना पाठिंबा देण्यापासून थांबवणे त्यांना शक्यच नव्हते. अखेर रागाच्या भरात त्यांनी भाजपाच्या प्रचारफेरीवाराच हल्ला चढवला.
हे ही वाचा:
मिठी नदीतून सापडले सचिन वाझेच्या पापाचे पुरावे
कम्युनिस्ट नेत्याच्या हत्येसाठी तृणमूल नेत्याला अटक
उद्धव ठाकरेंना कणा नाही, हे सरकार बरखास्त करा
वाझेचा साथीदार धनंजय गावडेची अटक आता अटळ
मोटारसायकलवर स्वार असणाऱ्या डाव्या कार्यकर्त्यांनी आपल्या गाड्याच भाजपाच्या प्रचारफेरीवर घातल्या. यात काही भाजपा कार्यकर्ते जखमी झाले. भाजपाच्या प्रचारफेरीवर हल्ला केल्यानंतर ते डावे कार्यकर्ते त्यांच्या पक्षाच्या स्थानिक कार्यलयात जाऊन लपले. ही माहिती समजताच भाजपाचे कार्यकर्ते त्या कार्यालयाबाहेर धडकले. हल्लेखोर डाव्या कार्यकर्त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी यासाठी भाजपातर्फे जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. पण पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही.