बालकल्याण मंत्री म्हणतात, महिलांनो झोपायच्या आधी थोडी दारू प्या!

बालकल्याण मंत्री म्हणतात, महिलांनो झोपायच्या आधी थोडी दारू प्या!

छत्तीसगडमधील काँग्रेस सरकारने निवडणुकीमध्ये दारूबंदीचे आश्वासन दिले होते. जनतेला दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी सध्या सरकार राज्यात दारू बंदी लागू करण्याच्या तयारीमध्ये आहे. याच दरम्यान छत्तीसगड सरकारमध्ये महिला आणि बालविकास मंत्री असलेल्या अनिला भेडिया यांनी महिलांना एक अजब सल्ला देत वादग्रस्त विधान केले आहे. ‘झोपायच्या आधी एक पेग घेत जा, जेणेकरून तुम्ही तणावातून मुक्त होऊ शकाल,’ असा अजब सल्ला भेडिया यांनी महिलांना दिला आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्यावरून आता वाद निर्माण झाला आहे.

‘महिला घर आणि कुटुंबाची काळजी घेत असतात. त्यांना मानसिक तणाव जाणवतो. अशा वेळी थोडी- थोडी प्या आणि झोपा,’ असे विधान त्यांनी केले. आपल्या वक्तव्यावरून वाद वाढत असल्याचे पाहून त्यांनी स्पष्टीकरण देत म्हटले आहे की, ‘माझ्या वक्तव्याला चुकीच्या पद्धतीने सादर केले जात आहे.’

हे ही वाचा:

राहुल द्रविडकडे प्रशिक्षकपदाची जबाबदारी

‘उद्धवजींमध्ये राहुलजी स्पष्ट दिसतात’

दैनिक जागरण समूहाचे योगेंद्र गुप्ता कालवश

धोनीच्या ३००व्या सामन्यात चेन्नई संघाने लुटले विजेतेपदाचे सोने

अनिला भेडिया म्हणाल्या की, ‘मी दारूच्या आहारी गेलेल्या पुरुषांना संबोधित करत होते आणि मी त्यांना म्हणाली की दारू कमी प्यायला हवी. घर आणि मुलांच्या जबाबदाऱ्यांमुळे महिलांना खूप मानसिक दबावाला सामोरे जावे लागते. मला म्हणायचे होते की दारूचे व्यसन वाईट आहे आणि प्रत्येकाने त्यापासून दूर राहायला हवे,’ असे अनिला भेडिया यांनी स्पष्टीकरण दिले.

दरम्यान, त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मंत्री अनिला भेडिया बुधवारी छत्तीसगड येथील सिंघोला गावात लोकांना संबोधित करत होत्या. कमर जमातीच्या महिलांशी बोलताना त्या त्यांना सांगत होत्या की, ‘जेव्हापासून सरकारने गावकऱ्यांना स्वतःची दारू बनवण्याची परवानगी दिली आहे, तेव्हापासून गावात दारूच्या विक्रीत वाढ झाली आहे.’

Exit mobile version