करार आणि करारी

करार आणि करारी

‘हमे तो लुटा अपनोंने, गैरों मे कहा दम था’ हा शेर भारतात प्रसिद्ध आहे. अनेक ठिकाणी वापरला जातो तो. पण हा शेर भारतात प्रचलित असणे हा केवळ योगायोग नाही. भारताचा इतिहासच काहीसा तसा राहिलाय. भारतावर जेव्हा जेव्हा परकिय शक्तींची आक्रमणे झाली आहेत तेव्हा त्यांना पायघड्या घालणारे, सहकार्य करणारे हे इथले स्थानिकच होते. असे अनेक ‘जयचंद’ आजवर या देशात निपजले. ‘जयचंद’ ही केवळ एक व्यक्ती नसून वृत्ती आहे. ही वृत्ती आपल्याला प्रत्येक काळात दिसून येईल. आज जर या वृत्तीचे एखादे चालते बोलते उदाहरण आपल्याला पहायचे असेल तर ते म्हणजे काँग्रेस नेते राहुल गांधी.

आज सारे जग कोरोना नावाच्या जिवघेण्या शत्रूशी दोन हात करत आहे. चीनने जगात सोडलेला हा व्हायरस साऱ्या जगासाठी डोकेदुखी ठरत आहे. भारतही त्याला अपवाद नाही. पण भारतात कोरोनामुळे दगावणाऱ्या लोकांची कोरोना निर्मात्या चीनकडून खिल्ली उडवली जात आहे. काही दिवसांपूर्वी चायनाने एक राॅकेट लाॅन्च केले. तेव्हा चायनाच्या कम्युनिस्ट पार्टीने राॅकेट लाॅन्चिंग सोबत भारतात जळणाऱ्या चितांचा फोटो समाज माध्यमांवर पोस्ट करत त्याची खिल्ली उडवली. यावरून आपल्याला कोरोनामागच्या जागतीक कटाचा अंदाज येतो. अशा परिस्थितीत आपसातले हेवेदावे विसरून देश म्हणून एकत्र काम करण्याची गरज आहे. पण बहुदा ही गोष्ट काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना कळलेली दिसत नाही.

हे ही वाचा:

कोविडविरोधात डीआरडीओचे ‘अस्त्र’

कोविड पाठोपाठ बळावतोय आणखी एका आजाराचा धोका

४६ वर्षांनंतर आणखी एक पारसी खेळाडू टीम इंडियाचा भाग

कोविड रुग्णांना भारतीय बनावटीच्या ‘वायुपुत्रा’ची साथ

राहुल गांधी आल्या दिवशी ट्विटरच्या माध्यमातून केंद्र सरकारवर निशाणा साधत असतात. कधी ते सेंटर व्हिस्टावरून बोलतात, कधी जीएसटीवरून तर कधी सरकार कोविड विरोधात काहीच करत नसल्याचा खोटा दावा ते करतात. ७ मे रोजी राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना एक पत्र लिहीले आहे. या पत्रात राहुल गांधी यांनी भारताच्या लसीकरण मोहीमेवर टीका केली आहे. वास्तविक भारताच्या लसीकरण मोहीमेचे जगभरातून कौतूक होत आहे. आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या मुख्य अर्थतज्ञ गीता गोपिनाथ यांनी भारताच्या कोविड लसीकरण धोरणाचे कौतुक केले आहे. भारत हा लसनिर्मीतीचे प्रमुख केंद्र बनला आहे असे त्या म्हणाल्या आहेत. भारतातले लसीकरणाचे आकडे पाहिले तरी ते याला पुष्टी देतात. १२ कोटी लोकांचे लसीकरण सर्वात जलद गतीने करणारा देश भारत आहे. ज्यासाठी अमेरिकेला ९७ आणि चीनला १०८ दिवस लागले ते भारताने ९२ दिवसांत साध्य केले आहे. पण तरिही आपल्या राजकारणाच्या नादात राहुल गांधींनी भारताची लसीकरण मोहीम फसली असल्याचे म्हटले आहे. गंमत म्हणजे भारतीय लसीकरण मोहिमेवर टीका करणाऱ्या राहुल गांधींनी आणि त्यांची आई सोनिया गांधी यांनी अजूनही लस घेतली नाही. यामागचे नेमके कारण काय अजूनही समोर आले नाही. बहुदा वरचेवर परदेश दौऱ्यावर जाणाऱ्या गांधी माय लेकाने परदेशात एखादी लस घेतली असावी आणि इथे भारतीय लसीकरण मोहीमेवर आपल्या राजकीय फायद्यासाठी टीका करत आहेत. पण त्यांच्या या राजकारणामुळे देशावर निशाणा धरून बसलेल्यांना ‘हात’भार तर लागत नाही ना? याचा विचार करण्याची गरज आहे.

राहुल गांधींच्या या अशा कारनाम्यांची ही पहिली वेळ नाही. विशेषतः जेव्हा जेव्हा विषय भारत आणि चीन यांच्यातला असतो तेव्हा तेव्हा राहुल गांधींचे ‘ड्रॅगन’प्रेम भलतेच उफाळून आल्याचे दिसले आहे. २०१७ मध्ये जेव्हा भारत आणि चीनी सैन्यामध्ये डोकलाम येथे स्टँड ऑफ सुरू होता तेव्हा तेथील परिस्थिती समजून घेण्यासाठी राहुल गांधी भारत सरकार किंवा प्रशासानाकडे गेले नाहीत. उलट ते चायनाच्या राजदूताला जाऊन भेटले. बहुदा त्यांना भारत सरकारपेक्षा ते जास्त जवळचे वाटले असावेत. गेल्या वर्षी २०२० मध्ये जेव्हा गलवान खोऱ्यात भारत-चीन सैन्यामधे तणाव सुरू होता. तेव्हा आपल्या भारतीय सैनिकांनी प्राणपणाने लढा देत आपल्या इंच इंच भूमीचे रक्षण केले. पण तरिही राहुल गांधींनी चीनने भारतीय भूमीवर कब्जा मिळवला आहे असे म्हणत भारत सरकारविरोधातच कांगावा सुरू केला. हे एक प्रकारे आपल्या सैन्याच्या पराक्रमावर केवळ प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे नव्हते, तर अपमान करणारेही होते. पण तरिही राहुल गांधी यांनी ते केले. वास्तविक चीनने भारताचा जो काही भाग बळकावला तेव्हा देशात सत्ता काँग्रेसची होती आणि पंतप्रधानपद भूषविणारे राहुल गांधींचे पणजोबा हे ‘पंचशील’ मध्ये व्यस्त होते.

सोनिया गांधी अध्यक्षपद भूषवत असलेल्या राजीव गांधी फाऊंडेशनला चीन कडून देणगी रूपाने पैसा पुरवला जातो असा आरोप गेल्या वर्षी भाजपाने केला होता. २००५-०६ साली या फाऊंडेशनला चीनकडून तीन लाख डाॅलर्सची देणगी मिळाली असा आरोप भाजापाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी केला होता. तर अमित मालविय यांनी तर थेट राजीव गांधी फाऊंडेशनच्या दात्यांचीच यादी जाहीर केली. यात भारतातील चीनी दुतावासासोबतच, चीन या देशाचाही देणगीदार म्हणून उल्लेख आहे. तर काँग्रेस पक्षाने २००८ सालीच चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीसोबत एक करार केला आहे. या करारातल्या नेमक्या बाबी आजही देशासमोर नाहीत. सर्वोच्च न्यायालयानेही या करारावर सवाल उपस्थित केला आहे.

या सर्व गोष्टी बघता राहुल गांधी आणि त्यांच्या काँग्रेस पक्षाला चीन किती जवळचा आहे हे लक्षात येतेच. त्यामुळे चीनी व्हायरस सोबत भारताचे युद्ध सुरू असताना या लढाईला कमजोर करण्याचा प्रयत्न राहुल गांधीकडून केला जात आहे का? हा सवाल उपस्थित करायला नक्कीच वाव आहे आणि राहुल गांधी भारत सरकारला सहकार्य करायचे सोडून त्यांच्यावर आरोप करत स्वतः भोवतीचे हे संशयाचे धुके आणखीनच वाढवत आहेत. आज भारत देश अशा एका परिस्थितीतून जात आहे जिथे देशाला चीन सोबत छुपे करार करणाऱ्यांची नाही तर एका करारी नेतृत्वाची गरज आहे. सुदैवाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रूपाने तसे खंबीर नेतृत्व देशाला लाभले आहे.

– स्वानंद गांगल
(मुख्य उपसंपादक, न्यूज डंका)

Exit mobile version