लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यासाठीचा प्रचार जोरदार सुरू असून यादरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हिमाचल प्रदेशातील हमीरपूरमधून काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. अमित शहा सभेत म्हणाले की, “सहाव्या टप्प्याचे मतदान होत आहे. नरेंद्र मोदी यांनी केवळ पाच टप्प्यांत ३१० चा टप्पा पार केला आहे. आता सहाव्या-सातव्यात ४०० चा आकडा पार करून मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवायचे आहे. ४०० पार करण्याची जबाबदारी सातव्या टप्प्यातील लोकांवर आहे,” असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी त्यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल करताना म्हटलं की, “राहुल बाबा आणि त्यांची बहीण शिमल्यात सुट्टीसाठी येतात पण ते रामलल्लाच्या अभिषेकला गेले नाहीत. ते गेले नाहीत कारण त्यांना त्यांच्या व्होट बँकेची भीती वाटते. एकीकडे राहुल बाबा आहेत, जे दर सहा महिन्यांनी सुट्टी साजरे करतात आणि दुसरीकडे नरेंद्र मोदी आहेत, जे २३ वर्षांपासून दिवाळीसुद्धा सीमेवर लष्कराच्या जवानांसोबत मिठाई खात साजरी करतात. देशातील जनतेसमोर दोन्ही प्रकारची उदाहरणे आहेत,” असे अमित शाह म्हणाले.
हे ही वाचा:
‘हेलिकॉप्टरमधून फिरणारे लवकरच तुरुंगात जातील’
अजय देवगण, रोहित शेट्टी यांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये केले ‘सिंघम अगेन’चे शूटिंग!
पॅट कमिन्सचा हैदराबादचा संघ पुन्हा एकदा अंतिम फेरीत
अग्रवाल कुटुंबीयांनी चालकाचा फोन काढून घेतला, खोलीत डांबून ठेवले, जबाब देण्यासाठी धमकावले आणि….
अमित शाह यांनीही पीओकेबाबत वक्तव्य करत काँग्रेस आणि राहुल गांधींवर निशाणा साधला. “काँग्रेस नेते आम्हाला पीओकेबद्दल बोलू नका म्हणून घाबरतात, पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे. आम्ही भाजपावाले अणुबॉम्बला घाबरत नाही. स्पष्टपणे सांगतो, पीओके भारताचा आहे, राहील आणि आम्ही तो घेऊ,” असा दावा अमित शाह यांनी केला आहे. तसेच, या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस ४० च्या खाली जाईल आणि एनडीए ४०० पार करेल असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला आहे. हमीरपूरमध्ये केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. तर काँग्रेसच्या तिकिटावर सतपाल रायजादा निवडणुकीच्या रिंगणात आहेत.