राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शनिवारी अकोला येथे सभा घेऊन काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. काँग्रेसला अनुसूचित जाती, प्रवर्गातील जातींमध्ये भांडण लावून द्यायची आहेत, अशी टीका करत त्यांनी सर्व मतदारांना ‘एक हैं, तो सेफ हैं’ असं म्हणत मतविभाजन टाळण्याचा सल्ला दिला आहे.
“अनुसूचित जाती प्रवर्गतील वेगवेगळ्या जातींमध्य एकमेकांशी भांडण व्हावे, असे काँग्रेसला वाटतं. समाजाच्या वेगवेगळ्या जाती आपापसात भांडत राहिल्या तर त्यांचा आवाज कमी होईल, हे काँग्रेसला माहिती आहे आणि असं झालं तर काँग्रेसचा सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा होईल. चांभार- मातंग, मातंग विरुद्ध महार, कैकाडी- खाटिक अशा या अनेक जातींमध्ये काँग्रेसला भेद करून भांडणे लावून द्यायची आहेत. तुम्ही एकत्र न राहता भांडण करत राहिले तर त्याचा काँग्रेस फायदा उचलणार आहे. काँग्रेसची ही चाल आहे. काँग्रेसचे हेच चरित्र आहे. म्हणूनच तुम्हाला काँग्रेसच्या या चालीपासून तुम्ही सावध राहायचे आहे. तुम्ही ‘एक हैं, तो सेफ हैं’ हे लक्ष ठेवायचं आहे,” असं नरेंद्र मोदी म्हणाले.
“हरियाणामधील लोकांनी काँग्रेसला धुळ चारली. काँग्रेसच्या काळात तेथे दलितांविरोधात दंगे झाले. हाच काँग्रेसचा खरा चेहरा आहे. पंडित नेहरुंपासून ते आजपर्यंत काँग्रेसच्या शाही परिवाराने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वारंवार अपमानित केलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या कोणत्याही मोठ्या कामाचे श्रेय काँग्रेसने त्यांना दिलेले नाही. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाचे पहिले कायदामंत्री म्हणून देशात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. मात्र काँग्रेसने हे श्रेयदेखील बाबासाहेब आंबेडकर यांना दिले नाही. आमच्या सरकारने आंबेडकरांचे योगदाने जगभरात मोठ्या प्रखरतेने मांडले आहे. आम्ही आंबेडकर जेथे-जेथे राहिले त्या ठिकाणांना पंचतीर्थ म्हणून घोषित केलेलं आहे. हे पंचतीर्थ आगामी पिढ्यांना प्रेरित करत राहील. मी शाही परिवाराला आव्हान देतो की, या शाही परिवाराने या पंचतीर्थांना कधी भेट दिली असेल तर ते देशासमोर ठेवावे. मी या सर्व पंचतीर्थांना भेट देऊन नमन करून आलेलो आहे,” अशी कठोर टीका नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केली आहे.
“माझी लाडकी बहिण योजनेचा विस्तार, रोजगार, विकासाची कामे, स्वाभिमानी युवा शिक्षण अशा महायुतीच्या घोषणापत्रासोबत महाविकास आघाडीचे ‘घोटालापत्र’ आले आहे. महाआघाडी म्हणजे करोडो रुपयांचे घोटाळे उघड झाले आहेत. जिथे काँग्रेस सरकार बनते तिथे शाही परिवारचा एटीएम बनते. कर्नाटक, तेलगंणात वसुली डबल केली आहे. महाराष्ट्राने सावधान राहायचे आहे. महाविकास आघाडीच्या घोटाळ्यांचे एटीएम राज्याला नाही बनू द्यायचे,” अशी खोचक टीका नरेंद्र मोदींनी केली आहे.
पुढे नरेंद्र मोदी म्हणाले की, “आज ९ नोव्हेंबरची तारीख ऐतिहासिक असून आजच्याच दिवशी २०१९ मध्ये देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिराबद्दल निर्णय दिला होता. न्यायालयाच्या निर्णयानंतर प्रत्येक धर्माच्या लोकांनी संवेदनशीलतेचा परिचय दिला. राष्ट्र प्रथम ही भावना देशाची मोठी ताकद आहे. २०१४ ते २०२४ ही १० वर्ष महाराष्ट्राने भाजपाला सतत मनापासून आशिर्वाद दिला आहे. महाराष्ट्राच्या लोकांची राजकीय समज आणि दूरदृष्टी यामुळे माझ्यासाठी महाराष्ट्राच्या सेवेचे सुख वेगळं आहे,” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
हे ही वाचा..
‘एक हैं तो सुरक्षित हैं’ बरोबर आता आरएसएसची ‘सजग रहो’ मोहीम
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचे ‘संकल्प पत्र’ उद्या जाहीर होणार
पाकिस्तानमधील क्वेटा रेल्वे स्थानकावर भीषण स्फोट; २२ हून अधिक जणांचा मृत्यू
मुंबईत बांगलादेशी, रोहिंग्या वाढतील, २०५१ पर्यंत हिंदू राहतील ५४ टक्के
“मागच्या दोन कार्यकाळात गरीबांना चार कोटी पक्की घरी बांधून दिली. आता आम्ही गरीबांसाठी तीन कोटी नवीन घर बांधणीची सुरुवात केली आहे. यामुळे महाराष्ट्रातीलही लाखो गरीबांचं पक्क्या घराचे स्वप्न पूर्ण होईल. माझ एक काम करा. आता निवडणुकीच्यावेळी तुम्ही गावागावात, घराघरात जालं. तुम्हाला कुठे जाताना एखाद कुटुंब झोपडीत राहताना दिसलं, तर नाव, पत्ता लिहून मला पाठवा. त्यांना पक्क घर मिळेल. माझ्यासाठी तुम्हीच मोदी आहात. तुम्ही त्यांना शब्द द्या, मी पूर्ण करीन,” असं आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी दिलं आहे.
“निवडणूक काळात मी ७० वर्षावरील वृद्धांना मोफत उपचारांचे आश्वासन दिले होते. आमच्या सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी ही योजना आणली आहे. ७० वर्षांवरील वृद्धांना आयुषमान कार्ड मिळायला सुरुवात झाली आहे. सबका साथ, सबका विकास या भावनेसह या योजनेचा लाभ प्रत्येक वर्गाला मिळेल,” असं नरेंद्र मोदी म्हणाले.