“आमची संघटनात्मक पातळीवर चर्चा सुरु आहे. आगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आम्ही स्वबळावर लढणार आहोत,” अशी घोषणा काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. यावेळी बोलताना काँग्रेसची निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
“यावेळची मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आम्ही स्वबळावर लढवणार आहोत. त्यासाठी आम्ही तयारी सुरु केली आहे. आम्ही संघटनात्मक पातळीवर चर्चा करणार आहोत. २०२४ ची लोकसभा निवडणूक सध्या लांब आहे. मात्र, पक्षाचा विस्तार आणि स्थिती वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहोत.” असे नाना पटोले म्हणाले.
नाना पटोले यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी धडाडीने काम करणे सुरु केले आहे. बिनधास्त आणि बेधडक व्यक्तिमत्व अशी नाना पटोलेंची ओळख आहे. आगामी काळात राज्यात मुंबई, औरंगाबाद, नाशिक, ठाणे अशा महत्त्वाच्या शहरांत महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नाना पटोले यांनी आगामी मुंबईची महापालिका निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याचे सांगितले. त्यासाठी पक्षामध्ये संघटनात्मक पातळीवर चर्चा सुरु असल्याचेही ते म्हणाले आहेत.
नाना पटोले यांनी नुकताच विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. महाविकास आघाडीचे सरकार राज्यात असताना काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीने एकत्रितपणे निवडणुका लढवणे अपेक्षित आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये तिन्ही पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढले होते. या पार्श्वभूमीवर काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची नाना पटोलेंची घोषणा ही नक्कीच भुवया उंचावणारी आहे.