काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अश्लाघ्य भाषेत टिप्पणी केल्याबद्दल विमानातून उतरवून अटक करण्यात आली. त्यानंतर काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
रायपूर, छत्तीसगड येथे अखिल भारतीय काँग्रेसच्या बैठकीसाठी काँग्रेस नेते निघाले होते. त्यावेळी इंडिगो विमानातून पवन खेरा यांना उतविण्यात आले आणि आसाम पोलिसांनी त्यांना अटक केली.
पवन खेरा यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली की, हा दीर्घ संघर्ष आहे आणि मी त्यासाठी सज्ज आहे. त्यानंतर काँग्रेसच्या अन्य नेत्यांनीही विमानातून उतरत विमानतळावरच ठिय्या दिला आणि घोषणाबाजी सुरू केली. तेव्हाही त्यांनी मोदी तेरी कबर खुदेगी अशा घोषणा देत पातळी ओलांडली.
हे ही वाचा:
भारत ते गयाना लवकरच थेट विमानसेवा
मैदानी चाचणी दरम्यान दुसऱ्या भरती उमेदवाराचा मृत्यु
जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांचा पुतळा जाळण्यास सांगितला
खेरा यांना विमानातून उतरवताना आधी सांगण्यात आले की, त्यांच्या सामानासंदर्भात काही समस्या आहे. त्यानंतर तुम्हाला विमानाने पुढे जाता येणार नाही, असे सांगण्यात आले. नंतर पोलिस उपायुक्तांशी आपल्याला बोलावे लागेल असे सांगण्यात आले. त्यानंतर काही काळ प्रतीक्षा केल्यावर पोलिस उपायुक्तांशी त्यांचा संवाद झाला.
आसाममध्ये भाजपा कार्यकर्त्याने केलेल्या तक्रारीवरून आसाम पोलिसांनी खेरा यांना विमानातून उतरवले.
त्याआधी, एका पत्रकार परिषदेत खेरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात खालच्या भाषेत टिप्पणी केली होती. ते म्हणाले होते की, नरसिंहाराव यांनी जर संयुक्त संसदीय समिती स्थापन केली, अटल बिहारी वाजपेयी यांनी अशी समिती तयार केली तर मग नरेंद्र गौतमदास…सॉरी दामोदरदास…मोदी यांना काय समस्या आहे? त्यानंतर आपल्या शेजारी बसलेल्या सहकाऱ्याशी त्यांनी मोदींचे मधले नाव बरोबर आहे का याची खात्री केल्याचा देखावा केला. त्यावर भाजपाने खेरा यांची ही कृती जाणीवपूर्वक केलेली होती, असा दावा केला. काँग्रेसने यावर म्हटले की, भारत जोडो यात्रेला मिळालेल्या यशामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.