देशाच्या राजधानीत होऊ घातलेल्या जी-२० परिषदेच्या निमित्ताने शहराला सजवण्यात आले आहे. ठिकठिकाणी विविध देशांचे राष्ट्रध्वज फडकत आहेत. तसेच, ठिकठिकाणी जी-२०चे पोस्टर्सही लावण्यात आले आहेत. मात्र एका पोस्टरवरून आता वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर काँग्रेसच्या नेत्यांनी पंतप्रधान मोदी हे सर्वाधिक लोकप्रिय असल्याचा दावा करणारे पोस्टर शेअर केले आहेत. जगभरातील पाहुणेमंडळी दिल्लीत येत असतानाच हे पोस्टर लावण्यात आल्याचा दावा काँग्रेसतर्फे करण्यात आला आहे. मात्र भाजपने या पोस्टरला बनावट म्हटले आहे. तर, शशी थरूर आणि पवन खेरा यांनी गुरुवारी ‘एक्स’वर हे पोस्टर शेअर करून प्रश्न उपस्थित केले आहेत.
‘आपण या प्रकारे आपल्या पाहुण्यांचे स्वागत करतो का?,’ असा प्रश्न पवन खेडा यांनी उपस्थित केला आहे. यावेळी त्यांनी विजय गोयल यांना टॅग केले आहे. पोस्टमध्ये असलेल्या पोस्टरवर पंतप्रधान मोदी यांना जगभरातील सर्वांत लोकप्रिय नेता, असे दर्शवण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी यांना ७८ टक्के मते मिळाली तर, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांना ४० टक्के मते मिळाली, असे यात नमूद करण्यात आले आहे. पोस्टरवर ऑस्ट्रेलिया, इटली, ब्राझिलसह अन्य देशांच्या नेत्यांची छायाचित्रे आहेत. पोस्टरवर ‘अभिनंदन भारत, पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वांत लोकप्रिय नेते आहेत,’असे लिहिले आहे. या पोस्टरवर विजय गोयल यांचे नावही आहे.
हे ही वाचा:
पारशी समुदायाचा उगम मध्य पूर्व आणि दक्षिण आशियाईतला
चार वर्षात आर्थिक गुन्हेगारांकडून ११.८ अब्ज डॉलर्सची मालमत्ता जप्त
आताच पाहा, नाहीतर निशिमुरा धुमकेतू दिसणार थेट ४०० वर्षांनंतर
भाजप नेते विजय गोयल यांनी मात्र या पोस्टरला बनावट संबोधले आहे. त्यांनी पवन खेरा यांना ‘टॅग’ करून ‘हे वृत्त बनावट आहे. अशा प्रकारे कोणतेही होर्डिंग लावण्यात आलेले नाही. भारत जगभरातील नेत्यांचे स्वागत करत असताना काँग्रेसने अशा प्रकारे कोणतेही राजकारण करता कामा नये,’ अशी टिप्पणी केली आहे. शशी थरूर यांनीही अशा प्रकारे होर्डिंग लावणे हा परदेशी पाहुण्यांचा अवमान आहे, अशी टीका करणारी पोस्ट लिहिली होती. त्यावर भाजपचे प्रवक्ते अमित मालवीय यांनी अशा प्रकारचे कोणतेही होर्डिंग दिल्लीत लागलेले नाही, असे स्पष्ट करून या वृत्ताला बनावट म्हटले आहे. त्यानंतर थरूर यांनी स्वत:ची पोस्ट डिलिट केली आहे.