इंडिया आघाडीत बिघाडी; स्पेन दौऱ्यावरून ममता बॅनर्जींना काँग्रेसने डिवचलं

इंडिया आघाडीत सर्व काही आलबेल नसल्याच्या चर्चा

इंडिया आघाडीत बिघाडी; स्पेन दौऱ्यावरून ममता बॅनर्जींना काँग्रेसने डिवचलं

केंद्रात भाजपाला पर्याय म्हणून विरोधकांनी ‘इंडिया’ नावाची आघाडी उघडली आहे. मात्र, आता या आघाडीत बिघाडी झाल्याच्या चर्चा समोर आल्या आहेत. इंडिया आघाडीतील प्रमुख पक्ष काँग्रेसने तृणमूल काँग्रेसवर टीकास्त्र सोडले आहे. त्यामुळे इंडिया आघाडीत सर्व काही आलबेल नसल्याचे बोलले जात आहे.

पश्चिम बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे. ममता बॅनर्जी यांच्या स्पेन दौऱ्यावर त्यांनी टीका केली आहे. राज्यात डेंग्यूच्या रुग्णांची प्रकरणे वाढत असताना ममता बॅनर्जी स्पेन दौऱ्यावर गेल्याची त्यांनी टीका केली आहे.

अधीर रंजन चौधरी म्हणाले की, ममता बॅनर्जी या स्पेनला जाऊ शकतात, पण लोकांच्या वेदना समजू शकत नाही. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये डेंग्यूचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होण्याचा इशारा राज्य सरकारला देण्यात आला होता. केवळ सरकारच्या सामान्य जनतेकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे हा प्रकार घडल्याचं चौधरी यांनी म्हटलं आहे.

स्पेन दौऱ्यावर असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या स्पेनमधील आलिशान हॉटेलमधील मुक्कामावरूनही अधीर रंजन यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. “आम्ही ऐकले आहे की, मुख्यमंत्री त्यांचा पगार घेत नाहीत. त्यांच्या पुस्तकांच्या विक्रीतून आणि चित्रांवरून स्वतःचा उदरनिर्वाह चालवितात. माद्रिदमधील एका हॉटेलमध्ये दररोज ३ लाख रुपये खर्च करून राहणे तुम्हाला कसे परवडेल?” असा सवाल त्यांनी केला आहे. अधीर रंजन यांनी त्यांच्या दौऱ्याचे वर्णन ‘लक्झरी ट्रिप’ असे केले असून या सहलीवर किती खर्च केला? तुम्ही कोणत्या उद्योगपतीला इथे आणले आहे? असे प्रश्न त्यांनी विचारले आहेत.

हे ही वाचा:

जोशीमठला आता नवे बांधकाम नको!

६४३ कोटी किलोमीटर अंतर पार करून लघुग्रहाचा तुकडा घेऊन नासाचे कॅप्सूल पृथ्वीवर

कैसमीच्या भारतीय संगीत प्रेमाची पंतप्रधानांनी घेतली दखल

चांद्रयान ३, जी-२० परिषदेने भारताला शिखरावर नेले!

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये डेंग्यूच्या प्रादुर्भावानंतर डेंग्यूचे निदान झालेल्या सहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील डेंग्यूमुळे झालेल्या मृत्यूंची संख्या या वर्षीची ३० पेक्षा जास्त झाली आहे, असे पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार अधिकाऱ्यांनी सांगितले.

Exit mobile version