राजस्थानच्या हनुमानगढ जिल्ह्यातील प्रेमपुरा भागात गुरुवारी एका दलित व्यक्तीची हत्या करण्यात आली. यामुळे स्थानिक रहिवाशांनी या घटनेचा निषेध केला आहे. सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधी पक्षांमध्ये राजकीय घमासान सुरु आहे. भाजपाने काँग्रेसच्या गेहलोत सरकारवर हल्लाबोल केला आहे. याप्रकरणी राजस्थान पोलिसांनी चार जणांना अटक केली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
रविवारी, बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) प्रमुख मायावतींनी विचारले की, “दलित व्यक्तीच्या संशयित हत्येवर काँग्रेस हायकमांड “गप्प” का आहे? हनुमानगढमध्ये एका दलिताची हत्या अत्यंत दुःखद आणि निंदनीय आहे, पण काँग्रेस हायकमांड गप्प का आहे? छत्तीसगड आणि पंजाबचे मुख्यमंत्री तिथे जाऊन (लखीमपूर प्रमाणे) पीडितेच्या कुटुंबाला प्रत्येकी ५० लाख देतील का? बसपाला उत्तरे हवी आहेत अन्यथा दलितांच्या नावाने मगरीचे अश्रू वाहणे थांबवा.” असं ट्विट मायावती यांनी केलं आहे.
भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा खासदार किरोडी लाल मीना म्हणाले की, “निर्दयी मारहाणीनंतर दलित युवकाची हत्या हे काँग्रेस सरकारच्या चुकीच्या कारभाराचे भयानक उदाहरण आहे.”
“हे दुर्दैवी आहे की राज्याचे मुख्यमंत्री फक्त आपली खुर्ची वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, तर राज्यातील गरीब, शेतकरी, महिला आणि दलितांवर सतत अत्याचार होत आहेत. जर आरोपींना अटक झाली नाही तर मी हनुमानगड गाठून पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळवून देईन.” असे त्यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
हनुमानगढच्या पोलीस अधीक्षक प्रीती जैन यांनी सांगितले की, आठ ओळखलेल्या आरोपींपैकी चार जणांना अटक करण्यात आली आहे. एकाला तो अल्पवयीन असल्याने ताब्यात घेण्यात आले आहे. बाकीच्यांना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे त्या म्हणाल्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जगदीश मेघवाल यांना आरोपींनी ७ ऑक्टोबर रोजी लाठ्यांनी मारहाण केली होती. एका महिलेशी असलेल्या त्याच्या कथित संबंधातून त्याला मारहाण करण्यात आली आणि गुन्हेगारांनी त्याच्या निर्घृण हत्येचा व्हिडिओ काढला. जगदीशचा मृतदेह नंतर त्याच्या निवासस्थानाबाहेर फेकण्यात आला.
हे ही वाचा:
कोळसा संकटावर काय म्हणाले केंद्रीय ऊर्जा मंत्री?
आरे वसाहतीत आता बिबट्यांपायी दुचाकीवरून फिरणेही मुश्कील
नवाब मलिकविरोधात १०० कोटींचा दावा करणार मोहित कंबोज
तत्पूर्वी, केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनीही उत्तरप्रदेशातील लखीमपूर खेरी येथील हिंसाचाराच्या घटनेचा निषेध करताना या प्रकरणावर “मौन” बाळगल्याबद्दल काँग्रेसच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारवर निशाणा साधला.