राज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांची राज्यसभेच्या जागेची मुदत १५ फेब्रुवारी रोजी संपुष्टात येणार आहे. या घडामोडींविषयी माहिती असलेल्या लोकांच्या मते, काँग्रेस पक्ष सध्या त्यांच्या पर्यायांचा विचार करत आहे.
लोकसभेतील कॉंग्रेसचे माजी नेते मल्लिकार्जुन खडगे, राज्यसभेतील पक्षाचे उपनेते आनंद शर्मा आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम हे या पदाचे दावेदार आहेत अशी माहिती मिळत आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस हायकमांडचे निकटवर्तीय दिग्विजय सिंह यांचेही नाव चर्चेत असल्याचे सांगितले जात आहे.
जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशातून १५ फेब्रुवारीपासून राज्यसभेचे कोणतेही प्रतिनिधी नसतील. सध्या जम्मू-काश्मीर मधून निवडून आलेले ४ राज्यसभा खासदार आहेत. यांची मुदत १५ फेब्रुवारीला संपत आहे. या केंद्रशासित प्रदेशात सध्या विधानसभा अस्तित्वात नसल्यामुळे तिथून राज्यसभा खासदारांची निवड होणे शक्य नाही. जेंव्हा विधानसभा निवडणूका होतील तेव्हा ते निवडून आलेले आमदार राज्यसभेचे खासदार निवडू शकतील.
पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाचे दोन खासदार नाझीर अहमद आणि मीर मोहम्मद फैयाज यांची मुदत अनुक्रमे १० आणि १५ फेब्रुवारीला संपुष्टात येणार आहे. तर आझाद यांची मुदत १५ फेब्रुवारीला आणि भारतीय जनता पक्षाचे शमशेरसिंग मनहास यांची मुदत १० फेब्रुवारीला संपणार आहे.
त्यामुळे आता काँग्रेस पक्ष गुलाम नबी आझाद यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवणार का? नाहीतर त्यांच्याजागी कोणाला विरोधीपक्ष नेता म्हणून निवडणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.