काँग्रेस अध्यक्षपदासाठी खर्गे-थरूर यांचे भवितव्य मतपेटीत बंद

आता निकालाची प्रतीक्षा १९ ऑक्टोबरला निर्णय

काँग्रेस अध्यक्षपदासाठी खर्गे-थरूर यांचे भवितव्य मतपेटीत बंद

काँग्रेस अध्यक्षपदासाठी सोमवारी मतदान पूर्ण झाले. अध्यक्षपदासाठीच्या या निवडणुकीच्या लढतीत ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर आमनेसामने आहेत. तब्बल २२ वर्षांनंतर होत असलेल्या या निवडणुकांचे निकाल १९ ऑक्टोबरला लागणार आहेत. पक्षप्रमुख निवडण्यासाठी ९,००० पेक्षा जास्त प्रदेश काँग्रेस कमिटी प्रतिनिधीनी गुप्त मतपत्रिकेद्वारे मतदानाचा हक्क बजावला. पक्षाच्या १३७ वर्षांच्या इतिहासात सहाव्यांदा एआयसीसी मुख्यालय आणि देशभरातील ६८ मतदान केंद्रांवर मतदान झाले आहे.

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस मुख्यालयात मतदान केले. काँग्रेस अध्यक्षपदाचे प्रबळ उमेदवार मानले जाणारे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी बंगळुरूमध्ये मतदान केले.कर्नाटकात थरूर यांच्या उमेदवारीवर मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, हा आमच्या अंतर्गत निवडणुकांचा भाग आहे. आम्ही एकमेकांना सांगितलेली प्रत्येक गोष्ट मैत्रीपूर्ण आहे. मतदानापूर्वी शशी थरूर यांनी मला फोन करून शुभेच्छा दिल्या आणि मीही त्यांना शुभेच्छा दिल्या, असे ते म्हणाले.

काँग्रेसचे अध्यक्षपदाचे उमेदवार शशी थरूर मतदानापूर्वी म्हणाले की, काँग्रेस पक्षाचे भवितव्य कार्यकर्त्यांच्या हातात आहे. खरगे यांच्यावर ते म्हणाले की, पक्षाचे नेते व अन्य साधनसामग्री दुसऱ्या उमेदवाराकडे असल्याने आमच्यासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. थरूर म्हणाले, काँग्रेसच्या पुनरुज्जीवनाची वेळ आली आहे. ते म्हणाले, “आज मी खरगे यांच्याशी बोललो आणि सांगितले की, काहीही झाले तरी आम्ही मित्र आणि मित्र राहू.

हे ही वाचा

बोरिवली ते ठाणे प्रवास आता तासात नाही मिनिटांत

रुद्रांक्ष पाटीलचा ‘ऑलिम्पिक वेध’

नर्मदा परिक्रमेचे अनुभव ऐकताना उपस्थितांना भरून आले

‘एकता कपूर बिघडवत आहे तरुणाईला!’

खूप दिवस प्रतीक्षा होती – सोनिया गांधी

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस मुख्यालयात मतदान केले. मतदान केल्यानंतर मी या दिवसाची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहे असे सोनिया गांधी पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या. राहुल गांधी यांनीही काँग्रेस अध्यक्षपदासाठी मतदान केले. भारत जोडो यात्रा शिबिरात उभारलेल्या बूथवर त्यांनी मतदान केले.

आजचा दिवस ऐतिहासिक : गेहलोत

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले की, “आज २२ वर्षांनी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. आजचा दिवस ऐतिहासिक आहे. ही निवडणूक पक्षातील अंतर्गत सौहार्दाचा संदेश देते. १९ ऑक्टोबरनंतरही गांधी कुटुंबाशी माझे संबंध कायम राहतील.काँग्रेस नेते सचिन पायलट म्हणाले की, काँग्रेस पक्षाने पारदर्शक, लोकशाही आणि खुल्या निवडणुका घेऊन देशासमोर आदर्श ठेवला आहे. या निवडणुकीत जो विजयी होईल त्याला सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळेल, याची मला खात्री आहे.

Exit mobile version