राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना काँग्रेसचा दबाव असल्यामुळे छत्रपती संभाजीनगर असे नाव करण्याची हिंमत झाली नव्हती. पण, महायुतीचे सरकार सत्तेत येताच जनतेची इच्छा पूर्ण केली, असे म्हणत नरेंद्र मोदी यांनी काँग्रेससह महाविकास आघाडीवर निशाणा साधला.
छत्रपती संभाजीनगरमधून बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “एका बाजूला संभाजी महाराजांना मानणारे लोक आहेत. तर, दुसरीकडे औरंगजेबाचे गुणगान गाणारे लोक आहेत. या शहराला संभाजी महाराजांचे नाव देण्याची मागणी बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती हे संपूर्ण महराष्ट्राला माहिती आहे. महायुतीचे सरकार येताच या शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर असे केले. महायुती सरकारने तुमची इच्छा पूर्ण केली. आम्ही बाळसाहेब ठाकरेंची इच्छा पूर्ण केली. औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर केल्यानंतर सगळ्यात जास्त त्रास हा कॉँग्रेस पक्षाला झाला होता. हा निर्णय बदलण्यासाठी यांची लोक न्यायालयात देखील गेले होते. ज्यांना संभाजीमहाराजांच्या नावावर आपत्ती आहे, अशी लोक महाराष्ट्र आणि मराठी स्वाभिमानाच्या विरुद्ध उभे आहेत,” अशी घाणाघाती टीका नरेंद्र मोदी यांनी केली.
काँग्रेसवर टीका करताना नरेंद्र मोदी म्हणाले की, “काँग्रेस पक्ष सरकार स्थापनेसाठी विकासावर नाही तर विभाजनावर अवलंबून आहे. काँग्रेस दलित, मागासवर्गीय आणि आदिवासींना पुढे जाण्यापासून रोखते जेणेकरून पिढ्यानपिढ्या सत्ता काबीज होत राहील. सत्तेत परतण्यासाठी काँग्रेसला सरकारमध्ये येण्याची संधी मिळाली तर ते एसी-एसटी आणि ओबीसी आरक्षण बंद करतील. काँग्रेसचे राजपुत्र परदेशात जाऊन आरक्षण रद्द करणार असल्याचे उघडपणे जाहीर करतात. आता आपला अजेंडा पुढे नेण्यासाठी काँग्रेस आणि आघाडी एससी आणि ओबीसी समाजाला छोट्या जातींमध्ये विभागण्याचे षडयंत्र रचत आहे. त्यामुळे आपल्याला सजग राहून एकता बळकट करायची आहे, एकात्मतेची ताकद वाढवायची आहे. त्यामुळे आपण एकजूट झालो तर आपण सुरक्षित आहोत, हे लक्षात ठेवावे लागेल,” असे आवाहन करत नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला.
हे ही वाचा :
मतदान अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या राजस्थानमधील उमेदवाराला अटक
भास्कर जाधव म्हणाले, काँग्रेसचे सुनील केदार म्हणजे मारुतीच्या बेंबीतला विंचू!
डॉमिनिका देशाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना सर्वोच्च सन्मान!
ठाकरेंना अदानींचं खाजगी विमान चालतं, एरव्ही अदानी खटकतात!
“महाराष्ट्राला भारताच्या विकसित व्हिजनचे नेतृत्व करायचे आहे. राज्यात आधुनिक सुविधा निर्माण होत आहेत. समृद्धी महामार्ग संभाजीनगर मधून जात आहे. महायुती आणि भाजप सरकार विकासाचे काम करत आहे. रेल्वेचे आधुनिकीकरण केले जात आहे. महायुती सरकार आल्यानंतर देशातील सर्वात जास्त गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे,” असंही नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले.