लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखेर राज्यातील महाविकास आघाडीचं जागा वाटप जाहीर झालं आहे. जागावाटपावरून महाविकास आघाडीच्या तीनही घटक पक्षांमध्ये नाराजी असल्याचे चित्र होते. ठाकरे गटाने जास्त जागा घेऊन काँग्रेसवर दबाव टाकल्याच्या चर्चा काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये होत्या. अखेर जागा वाटपानंतरच्या चित्रातही तीच परिस्थिती असल्याच्या चर्चा आहेत. महाविकास आघाडीत ठाकरे गटाने २१, शरद पवार गटाने १० आणि काँग्रेसने १७ जागांवर उमेदवारी सांगितली आहे. यात ज्या जागांवर वाद होते अशी भिवंडीची जागा शरद पवार गटच लढणार आहे. तर सांगलीची जागा ठाकरे गटाला देण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेसने या जागांवरून काढता पाय घेतल्याचे बोलले जात आहे. यामुळे काँग्रेसच्या गोटात नाराजी असल्याचे चित्र आहे.
संयुक्त पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीचे जागा वाटप जाहीर करण्यात आले आहे. या जागा वाटपात ठाकरे गटाला सर्वाधिक २१ जागा मिळाल्या आहेत. त्याखालोखाल काँग्रेसला आणि नंतर शरद पवार गटाला जागा मिळाल्या आहेत. मविआच्या संयुक्त पत्रकार परिषदेत शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तसेच पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, संजय राऊत आदी उपस्थित होते.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सांगलीच्या जागेवरून मोठा प्रश्न निर्माण झाला होता. विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांनी सांगलीच्या जागेवर काँग्रेसचा दावा सांगितला होता. मात्र, या जागेवर उद्धव ठाकरेंनी आधीच ठाकरे गटाचा उमेदवार जाहीर केला होता. त्यानुसार ही जागा काँग्रेसनं ठाकरे गटासाठी सोडली आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक काँग्रेस नेते नाराज असल्याची चर्चा आहे.
हे ही वाचा:
‘अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे, होता आणि राहील’
सौदी अरेबियाने काश्मीरबाबत भारताच्या भूमिकेचे केले समर्थन!
‘सरकारने वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे मणिपूरची परिस्थिती सुधारली’
एलन मस्क यांनी टाकले मार्क झुकेरबर्गला मागे!
ठाकरे गटाच्या २१ जागा
जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, रायगड, मावळ, धाराशिव, रत्नागिरी, बुलढाणा, हातकणंगले, संभाजी नगर, शिर्डी, सांगली, हिंगोली, यवतमाळ, वाशीम, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई दक्षिण आणि मुंबई ईशान्य
काँग्रेसच्या १७ जागा
नंदुरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली चिमूर, चंद्रपूर, नांदेड, जालना, मुंबई उत्तर मध्य, पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक आणि मुंबई उत्तर.
शरद पवार गटाच्या १० जागा
बारामती, शिरूर, सातारा, भिवंडी, दिंडोरी, माढा, रावेर, वर्धा, अहमदनगर दक्षिण आणि बीड.