कर्नाटकमध्ये काँग्रेसने सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू केल्या असल्या तरी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण असेल, यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. रविवारी रात्री आठ वाजता बेंगळुरूमध्ये झालेल्या काँग्रेस विधिमंडळाच्या बैठकीत अध्यक्ष मलिल्कार्जुन खरगे हेच आमदारांचे नेत्यांची निवड करतील, असा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
कर्नाटकचा मुख्यमंत्री ठरवण्यासाठी काँग्रेसमध्ये आता हालचालींना वेग आला आहे. रविवारी बेंगळूरूमध्ये डी. के. शिवकुमार आणि सिद्धारमय्या यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. रविवारी रात्री झालेल्या आमदारांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, अशी अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही. अखेर काँग्रेसच्या आमदारांच्या गटाने रविवारी सर्वसंमतीने प्रस्ताव मंजूर केला. त्यात कर्नाटक विधिमंडळाच्या नेत्याची निवड काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे करतील, असे जाहीर करण्यात आले. अर्थात या दरम्यान अशीही चर्चा सुरू आहे की, सिद्धारमय्या आणि डी. के. शिवकुमार सोमवारी दिल्लीचा दौरा करू शकतील. काँग्रेसने सुशीलकुमार शिंदे, दीपक बावरिया आणि जितेंद्र सिंह यांची कर्नाटकचे पर्यवेक्षक म्हणून निवड केली आहे. हे तिघेही आता दिल्लीला पोहोचले आहेत.
रविवारची काँग्रेसच्या विधिमंडळाची बैठक सुरू होण्यापूर्वी सिद्धारमय्या, डी. के. शिवकुमार आणि रणदीप सुरजेवाला यांनी स्वतंत्र बैठक घेतली होती. पर्यवेक्षकाने प्रत्येक आमदाराचे मत जाणून घ्यावे, असे निर्देश खरगे यांनी दिल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. आमदारांकडून मते जाणून घेण्याची प्रक्रिया रात्रीच पूर्ण केली जाईल आणि आमदारांचे मत काँग्रेसच्या अध्यक्षांना कळवले जाईल. त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष निर्णय घेतील.
हे ही वाचा:
“उद्धव ठाकरेंची अवस्था दरबारातल्या सरदारासारखी”
‘पुरुषांना दहशतवादाच्या जाळ्यात ओढण्याची कहाणीही दाखवा’
कर्नाटकमधील काँग्रेस विजयाच्या व्यूहरचनेचा हा शिल्पकार
सीबीआयप्रमुखांचे हिमाचल प्रदेश ‘कनेक्शन’
दोन्ही समर्थकांकडून घोषणाबाजी
कर्नाटकच्या निकालानंतर सिद्धारमय्या यांच्या घराबाहेर त्यांच्या समर्थकांनी ‘कर्नाटकचे पुढील मुख्यमंत्री सिद्धारमय्या’ अशी पोस्टर्स लावली आहेत. तर, डी. के. शिवकुमार यांच्या घराबाहेरही त्यांना कर्नाटकचा पुढील मुख्यमंत्री, असे संबोधून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. त्यांचा १५ मे रोजी वाढदिवस आहे.