काँग्रेसकडून राजीव गांधी यांच्या नावाने नवा पुरस्कार

काँग्रेसकडून राजीव गांधी यांच्या नावाने नवा पुरस्कार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये महिला आणि पुरूष हॉकी संघाने केलेल्या अप्रतिम कामगिरी निमित्त ‘राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारा’चे नाव बदलून ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ असे केले होते. मात्र ही गोष्ट काँग्रेसला चांगलीच झोंबली आहे. त्यामुळे त्यांनी लगेच दुसऱ्या पुरस्काराला राजीव गांधी यांचे नाव दिले आहे. आश्चर्य म्हणजे शिवसेनेने देखील याला संमती दिलेली आढळून आली आहे.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये असामान्य कामगिरी करत पुरूष हॉकी संघाने तब्बल ४१ वर्षांची पदकाची प्रतिक्षा संपवली. त्याबरोबरच महिला संघाने देखील कांस्यपदकासाठी झुंजार खेळी केली होती. या दोन्ही संघांच्या खेळाच्या निमित्ताने मोदी यांनी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला होता. मेजर ध्यानचंद यांचे भारतीय हॉकीमधील योगदान असामान्य आहे. ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगार देखील म्हटले गेले. त्यामुळे खेलरत्न पुरस्काराला मेजर ध्यानचंद यांचे नाव देऊन मोदी सरकारने ध्यानचंद यांचा सन्मान केला होता. मात्र काँग्रेसला ही बाब अजिबात सहन झाली नाही असे दिसते.

हे ही वाचा:

राज्यपालांच्या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

औरंगाबाद महापालिकेतही होता तळीरामांचा अड्डा?

लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित

छडी लागे छम् छम् विद्या येई घम् घम्, अशी ठाकरे सरकारची चंपी

मोदी सरकारच्या या निर्णयानंतर नुकताच ठाकरे सरकारने आयटी क्षेत्रासाठी नवा पुरस्कार जाहिर केल्याचे समजले आहे. विशेष म्हणजे, ठाकरे सरकारने या पुरस्काराचे नाव राजीव गांधी यांच्या नावावरून ठेवले आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीने आयटी क्षेत्रात देदिप्यमान कामगिरी करणाऱ्या कंपन्यांसाठी पुरस्कार जाहिर केला असून, या पुरस्काराला राजीव गांधी यांचे नाव देण्यात आले आहे. याबद्दल ठाकरे सरकारचे माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री सतेज पाटील यांनी ट्वीटरवरून माहिती दिली आहे.

काँग्रेसकडून मोदींच्या कृतीबद्दल संताप व्यक्त केला यात आश्चर्य नाही, परंतु शिवसेनेने देखील काँग्रेसची री ओढावी याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकाळात सातत्याने काँग्रेसवर घणाघाती टीका केली होती. त्याबरोबरच त्यांनी अनेकदा राजीव गांधींना देखील लक्ष्य केले असल्याचे स्मरण अनेकांना आहे. बाळासाहेब ठाकरे यांना सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून अग्रलेखांद्वारे काँग्रेसवर आणि राजीव गांधींवर टीकेची झोड उठवली आहे. परंतु, काँग्रेससोबत सत्ता स्थापन करताच, शिवसेनेला या सर्वांचा विसर पडला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शिवसेनेने यापूर्वीच हिंदुत्व त्यागल्याचे विविध उदाहरणांद्वारे समोर आले होते. त्यात जनाब बाळासाहेब ठाकरे असा उल्लेख, अजान स्पर्धा अशी काही मोजकी उदाहरणे देता येतील. त्यामुळेच शिवसेनेने देखील राजीव गांधी यांचे नाव उचलून धरावे या बद्दल रोष व्यक्त केला जात आहे.

Exit mobile version