काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचे निधन झाले आहे. रविवार, १६ मे रोजी सकाळी त्यांचे निधन झाले. एप्रिल महिन्यात त्यांना कोवीडने ग्रासले होते. त्यानंतर पुण्यात एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण त्यांची ही झुंज अपयशी ठरली आहे. वयाच्या ४६ व्या वर्षी सातव यांनी अखेरचा श्वास घेतला.
रविवारी काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांनी जगाचा निरोप घेतला. २२ एप्रिल रोजी सातव यांना कोवीडने आपल्या विळख्यात घेतले होते. तेव्हापासून सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. या उपचाराचा फायदा होऊन त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. काही दिवसांपूर्वीच सातव हे कोरोनमुक्त झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. पण सातव यांना न्यूमोनियाचा संसर्ग झाला होता. त्यासाठी त्यांच्यावर उपचार सुरु होते, पण तो बरा होत नव्हता. शनिवारी सातव यांची प्रकृती अचानक खालावली. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटर लावण्यात आला होता. पण रविवारी सातव यांच्या निधनाचे वृत्त समोर आले.
हे ही वाचा:
नाना पटोलेंना समजावणे म्हणजे गाढवापुढे वाचली गीता
इस्रायलने का केला मीडिया इमारतीवर हल्ला?
पब्लिक सब जानती है…देवेंद्र फडणवीसांचे सोनिया गांधींना पत्र
नक्की कोण खरं? सरकारी वकील की काँग्रेस?…भाजपाचा सवाल
महाराष्ट्र युवक काँग्रेस अध्यक्ष ते राज्यसभा खासदार
राजीव सातव हे महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचा युवा चेहरा म्हणून पुढे आले होते. त्यांनी महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवले. त्यांची ही अध्यक्षपदाची कारकीर्द फारच प्रभावी ठरली. त्यामुळेच त्यांच्यावर युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली. सातव हे ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सदस्य असून गुजरात राज्याचे प्रभारी होते. तर काँग्रेस वर्किंग कमिटीचे कायमस्वरूपीचे निमंत्रित सदस्य होते. पंचायत समिती सदस्य, मग आमदार अशा एक एक पायऱ्या चढत त्यांनी खासदारकीपर्यंत मजल मारली होती. २०१४ च्या मोदी लाटेतही राजीव सातव हे महाराष्ट्रातील हिंगोली मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. २०२० साली त्यांना काँग्रेस पक्षातर्फ़े राज्यसभेवर पाठवण्यात आले. सातव यांच्या जाण्याने महाराष्ट्र काँग्रेसमध्ये कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.