उत्तर कोल्हापूरचे काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन

उत्तर कोल्हापूरचे काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन

कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे नेते आणि उत्तर कोल्हापूर मतदार संघाचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन झाले आहे. गुरुवार, २ डिसेंबर रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. गेले काही दिवस आजारपणामुळे त्यांच्यावर उपचार केले जात होते. पण त्यातून ते बरे होऊ शकले नाहीत. जाधव यांच्या निधनाने त्यांचे समर्थक, कार्यकर्ते, निकटवर्तीय यांच्यात शोककळा पसरली आहे.

गेले आठ दिवस आमदार चंद्रकांत जाधव यांच्यावर हैदराबाद येथील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांचे आजारपण दूर करून त्यांना बरे करण्यासाठी डॉक्टरांची फौज शर्थीचे प्रयत्न करत होती. पण या प्रयत्नांना यश आले नाही आणि उपचारा दरम्यानच त्यांचे निधन झाले. गुरुवार, २ डिसेंबर रोजी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

हे ही वाचा:

किशोर गट राष्ट्रीय खोखोत महाराष्ट्राला दुहेरी विजेतेपद

ममता बॅनर्जी यांनी केला राष्ट्रगीताचा अपमान!

…आणि त्यावेळी अर्धवट बुद्धिवादी मूग गिळून गप्प होते

‘नायर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू’

गेल्या दीड वर्षांच्या कालावधीत चंद्रकांत जाधव यांना दोन वेळा कोरोनाने ग्रासले होते. त्यामुळे त्यांची प्रकृती चांगलीच खालावली होती. मधल्या काळात त्यांच्या प्रकृतीत सुधार झाला होता. ते पुन्हा एकदा आपल्या सामाजिक, राजकीय कार्यात सक्रिय झाले होते. पण अशातच काही दिवसांपूर्वी त्यांची तब्येत अचानक ढासळली. त्यामुळेच हैदराबाद येथील एका रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी चंद्रकांत जाधव यांनी ऐन निवडणुकीच्या धामधुमीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना उत्तर कोल्हापूर मतदारसंघातून तिकीटही दिले. केवळ पंधरा दिवसात काँग्रेसच्या तिकिटावर संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत त्यांनी मतदारांचा विश्वास संपादित केला आणि निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार राजेश क्षिरसागर यांचा पराभव केला. चंद्रकांत जाधव हे एक मनमिळाऊ आणि लोकप्रिय व्यक्तिमत्त्व म्हणून प्रसिद्ध होते.

Exit mobile version