काँग्रेसने राम मंदिर उद्घाटन सोहळ्यात सहभागी होण्याचे निमंत्रण धुडकावून लावले आहे. मात्र काँग्रेस हायकमांडच्या या निर्णयावर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनीच आक्षेप घेतला आहे. गुजरात काँग्रेसचे वरिष्ठ नेते अर्जुन मोढवाडिया यांनी ‘एक्स’वर हायकमांडच्या या निर्णयावर टीका केली आहे. त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांना टॅग करून सांगितले की, प्रभू राम आमचे आराध्य आहेत. हा देशवासींच्या भक्ती आणि विश्वासाचा प्रश्न आहे. राम मंदिराबाबत काँग्रेसने राजकीय निर्णय घेता कामा नये. तर, अन्य काँग्रेस नेता आचार्य प्रमोद कृष्णम यांनी सांगितले की, श्रीराम मंदिराच्या आमंत्रणाला धुडकावणे हा दुर्दैवी आणि आत्मघातकी निर्णय आहे. आज मन दुखावले आहे.
काँग्रेसने निमंत्रण धुडकावण्याचे हे दिले कारण
काँग्रेसने राम मंदिराचे निमंत्रण धुडकावण्याचे कारण दिले आहे. काँग्रेसच्या मते, हा भाजपचा राजकीय प्रकल्प आहे. धर्म ही एक व्यक्तिगत बाब आहे. मात्र भाजप व संघाने अयोध्येत राजकीय योजना बनवली आहे. भाजप-राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्धवट मंदिराचे उद्घाटन करत आहेत. निवडणुकीत लाभ मिळावा, यासाठी ते सर्व करत आहेत, अशी टीका काँग्रेसने केली आहे.
हे ही वाचा:
केरळच्या प्राध्यापकाचा हात कापणारा पीएफआयचा सदस्य १२ वर्षांनी जेरबंद!
१२ जानेवारीला पंतप्रधानांच्या हस्ते नवी मुंबईतील प्रकल्पांचे उदघाटन!
मी पुन्हा सांगतो, हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल!
कर्नाटकने केंद्रीय काँग्रेस नेतृत्वाच्या निर्णयाची केली पाठराखण
कर्नाटक सरकारने हायकमांडच्या निर्णयाची पाठराखण केली. ‘आम्ही सर्व हिंदू आहोत. मी हिंदू आहे. मी राम भक्त आहे. मी हनुमान भक्त आहे. आम्ही सर्व येथे प्रार्थना करतो. राम आमच्या हृदयात आहे. आमच्या हृदयात राजकारणाला कोणतीही जागा नाही,’ असे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी स्पष्ट केले.
भाजपने केली टीका
काँग्रेसच्या या निर्णयावर भाजपने जोरदार टीका केली आहे. ‘काँग्रेसने इतक्या वर्षांत राम मंदिरासाठी कोणतेही पाऊल उचलले नाही. काँग्रेसने तर प्रभू रामाच्या अस्तित्वालाच नकार दिला होता. काँग्रेसच्या हायकमांडने ते अयोध्येला जाणार नाहीत, हे स्पष्टच केले आहे,’ असे भाजपचे प्रवक्ते नलीन कोहली यांनी सांगितले. तर, ‘प्रभू रामाला काल्पनिक संबोधणाऱ्यांसाठी हा काही नवा निर्णय नाही. काँग्रेसने अयोध्येत बाबरी मशिदीच्या पुनर्निमाणाचे वचन दिले होते. प्रभू रामाचा बहिष्कार करणाऱ्या काँग्रेसलाच आता सन २०२४च्या निवडणुकीत जनताच बहिष्कार करेल,’ अशी टीका केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली होती. तर, मनोज तिवारी यांनी त्रेतायुगचा रावण आपले डोके गमावून बसला आहे, अशा शब्दांत काँग्रेसचा समाचार घेतला होता.