उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या निमित्ताने रोज नवे धक्के बसत आहेत. मंगळवारी उत्तर प्रदेशातील पडरौना राजघराण्याचे वंशज आणि काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री रतनजीत प्रताप नारायण सिंह तथा आरपीएन सिंह यांनी भाजपात प्रवेश केला. हा या निवडणुकीच्या आधी काँग्रेसला बसलेला मोठा धक्का मानला जात आहे.
भाजपाचे धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत आरपीएन सिंह यांनी भाजपात प्रवेश केला. प्रवेशानंतर बोलताना आरपीएन सिंह म्हणाले की, भाजपाचे कीर्तीवंत पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, गृहमंत्री अमित शहा यांना मी हृदयापासून धन्यवाद देतो की त्यांनी मला भाजपात सामावून घेतले. काही वर्षांतच आमच्या पंतप्रधानांनी भारताच्या प्राचीन संस्कृतीचा २१व्या शतकाशी मेळ घालून देत राष्ट्रनिर्माणाचे कार्य केले आहे. संपूर्ण देश त्यांच्या या कार्याचा गौरव करत आहे.
आरपीएन सिंह म्हणाले की, मी ३२ वर्षे एका पक्षात राहिलो. इमानदारीने आणि मेहनतीने काम केले. पण ज्या पक्षात राहिलो तो पक्ष आता राहिला नाही, ती विचारधारा राहिली नाही. राष्ट्रनिर्माणासाठी जे काही करता येईल ते मी करीन. अनेकवेळा लोकांनी मला सांगितले की, तुम्ही भाजपामध्ये जायला हवे. बराच काळ मी त्यावर विचार केला. असो. पण उशिरा का होईना योग्य निर्णय घेतला. ही माझ्यासाठी नवा प्रारंभ आहे. मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, गृहमंत्री अमित शहा यांच्या दूरदर्शी नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली राष्ट्रनिर्माणात आपले योगदान देण्यास सज्ज आहे.
आरपीएन सिंह यांनी त्याआधी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहून आपण काँग्रेसचे प्राथमिक सदस्यत्व आणि सर्व पदांचा राजीनामा देत असल्याचे कळविले. जनता आणि पार्टीची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी काँग्रेसचे आभार मानले.
हे ही वाचा:
भाजपाच्या आक्रमक भूमिकेनंतर राऊतांनी ते ट्विट केलं डिलीट
सीडीएस बिपिन रावत, प्रभा अत्रे, सोनू निगम पद्म पुरस्काराने गौरवित
ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक विजेत्यांनी गायले राष्ट्रगान
महाराष्ट्रातील पोलिसांना प्रशंसनीय कार्याबद्दल ५१ पदके
गेला काही काळ ते काँग्रेसच्या सर्व उपक्रम व मोहिमांपासून दुरावले होते. तेव्हाच ते पक्षबदल करण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. ते झारखंडचे काँग्रेस प्रभारीही होते. १९९६ ते २००९ या कालावधीत ते पडरौना मतदारसंघातून आमदार म्हणूननिवडून आले आणि २००९मध्ये ते पडरौना लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले आणि मंत्रीही बनले.