काँग्रेसला सोडचिठ्ठी देत रवी राजांनी हाती घेतले ‘कमळ’

देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये केला पक्ष प्रवेश

काँग्रेसला सोडचिठ्ठी देत रवी राजांनी हाती घेतले ‘कमळ’

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. मुंबई महानगरपालिकेतील काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेता आणि ज्येष्ठ नेते रवी राजा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपाला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. रवी राजा हे काँग्रेसमध्ये होते. सायन कोळीवाडा या ठिकाणाहून त्यांना तिकिट हवं होतं. मात्र, काँग्रेसने गणेश यादव यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेले रवी राजा यांनी भाजपात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.

रवी राजा यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे. सायन कोळीवाडा मतदारसंघांमध्ये काँग्रेसकडून तीन उमेदवार इच्छुक होते. त्यात पालिका विरोधी पक्षनेते रवी राजा, माजी आमदार जगन्नाथ शेट्टी यांचे पुत्र काँग्रेसचे मुंबई सचिव अमित शेट्टी आणि काँग्रेसचे सचिव गणेश यादव यांचा समावेश होता. मात्र, रवी राजा आणि अमित शेट्टी यांना डावलून काँग्रेसने गणेश यादव यांना उमेदवारी दिली. त्यामुळे रवी राजा आणि अमित शेट्टी यांनी पक्षश्रेष्ठींकडे नाराजी व्यक्त केली होती. मात्र, पक्षश्रेष्ठींकडून दाद न मिळाल्यामुळे रवी राजा यांनी बुधवारी मल्लिकार्जून खरगे यांच्याकडे राजीनामा पाठवून दिला. विधानसभा निवडणुकीपूर्वी रवी राजा यांचा राजीनामा हा काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

हे ही वाचा : 

वन नेशन, वन इलेक्शन लवकरच लागू होणार

बेरोजगार असलेल्या ५६ वर्षीय मुस्तफाने दिली होती सलमानला धमकी, केली अटक

दिवाळीनिमित्त पंतप्रधान मोदींनी निरोगी, आनंदी आयुष्यासाठी दिल्या शुभेच्छा

केंद्रीय खर्च निरीक्षक विजय बाबू वसंता यांच्यामार्फत मुंबई शहरातील स्टॅटिक सर्व्हेलन्स टीमचा आढावा!

काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपात जात असलेल्या रवी राजा यांनी म्हटले की, गेली ४४ वर्षे मी प्रामाणिकपणे काम केले, पाच वेळा नगरसेवक होतो, विरोधी पक्षनेता होतो. सायन कोळीवाड्यात तिकीट मागितले, पण २०१९ मध्ये हरलेल्या नेत्याला उमेदवारी दिली. काँग्रेसमध्ये मेरीटवर तिकीट देत नाहीत. वशिला, लॉबिंग असणाऱ्यांना तिकीट मिळते. दिल्लीत माझा वशिला नाही, असे रवी राजा यांनी म्हटले.

Exit mobile version