काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी मंत्री, राज्यसभा खासदार आनंद शर्मा यांनी मोदी सरकारच्या कामाचे कौतुक केले आहे. सरकारने लॉकडाऊनचा घेतलेला निर्णय आणि त्याची अंमलबजावणी अतिशय स्तुत्य होती असे शर्मा म्हणाले. खासदार शर्मा यांनी राज्यसभेचे सभापती आणि भारताचे उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्यासमोर कोविड अहवाल सादर केला. या वेळी शर्मा यांनी आपले विचार मांडले.
केंद्र सरकारच्या कोविड काळातील कामगिरीबद्दल ते खूपच समाधानी आहेत. “कोविड काळात भारताने आवश्यक पायाभूत सुविधांची निर्मिती केली हे खरंच कौतुकास्पद आहे. केंद्र आणि राज्य सरकारांनी समन्वयातून काम केले ज्यासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो. या वर्षीचे पहिले तीन महिने खूपच वाईट होते कारण आपला वाढीचा वेग खूपच मंदावला होता. पण दुसऱ्या तिमाहीत आपण सावरलो आहोत. येणाऱ्या दोन तिमाहीतही आपण अपेक्षित समतोल साधू.”
आनंद शर्मा यांनी नोव्हेंबर महिन्यातही पंतप्रधान मोदींची स्तुती केली होती. मोदींनी जेव्हा कोविड लसीचा आढावा घेण्यासाठी देशव्यापी दौरा केला. तेव्हा काँग्रेस पक्षाने पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर टीका केली होती. पण त्यावेळीही शर्मा यांनी मात्र मोदींच्या दौऱ्याचे कौतुक केले होते. शर्मा यांनी या संबंधीचे ट्विट्स केले होते. आनंद शर्मा हे काँग्रेसच्या ‘त्या’ २३ नेत्यांपैकी एक आहेत ज्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षात मोठ्या प्रमाणात संघटनात्मक बदलांची आवश्यकता आहे असे मत व्यक्त केले होते.