आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आपच्या नेत्या आतिशी मार्लेना यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतली. कार्यभार स्वीकारताना त्यांनी त्यांच्या बाजूला एक रिकामी खुर्ची ठेवत म्हटले की, ज्या प्रमाणे भरताने प्रभू रामाचे जोडे राज सिंहासनावर ठेवत १४ वर्षे राज्य कारभार सांभाळला, त्याचप्रमाणे मी पुढील चार महिने दिल्लीचा कारभार सांभाळणार आहे. यावरून आता आतिशी यांच्यावर निशाणा साधला जात असून दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष देवेंद्र यादव यांनीही आतिशी यांच्यावर ताशेरे ओढले आहेत.
दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष देवेंद्र यादव यांनी आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या सारख्या भ्रष्ट नेत्याची तुलना भगवान राम यांच्याशी केल्याबद्दल दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांच्यावर टीका केली आहे. तसेच त्यांनी टोला लगावत म्हटले आहे की, दिल्ली आता ‘राम भरोसे आहे.
दिल्लीतील एकूणच कारभारावर शोक व्यक्त करताना देवेंद्र यादव म्हणाले की, “ज्या भ्रष्ट व्यक्तीला अनेकदा तुरुंगात टाकले जाते त्या व्यक्तीची तुलना प्रभू श्री रामांशी केली जाते यावर माझा तीव्र आक्षेप आहे. दिल्ली आता ‘राम भरोसे’ झाली आहे. आपचे कारनामे उघड झाले आहेत. उन्हाळ्यात दिल्लीतील लोकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. पावसाळ्यात दिल्लीत पाणी साचते. सरासरी वीज बिलिंग दर पाच रुपयांवरून १० रुपये करण्यात आला आहे. संपूर्ण दिल्लीला अशुद्ध पाणी पुरवठा केला जात आहे,” असे म्हणत त्यांनी आतिशी यांच्यावर निशाणा साधला.
पुढे ते म्हणाले की, “दिल्लीच्या मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाकडून कोणत्याही अपेक्षा नाहीत कारण आतिशी यांनी स्वतःला डमी उमेदवार म्हणून चित्रित केले आहे. आतिशी यांनी ज्या प्रकारे स्वतःला डमी उमेदवार म्हणून चित्रित केले आहे, त्यामुळे महिलांच्या प्रश्नांवर महिला मुख्यमंत्र्यांनी अधिक विचार करावा, अशी आशा असलेल्या अनेक महिलांच्या भावना दुखावल्या आहेत. दररोज बलात्काराच्या घटना घडत आहेत. या सरकारकडून कोणत्याही अपेक्षा नाहीत,” अशी संतप्त देवेंद्र यादव येन केली आहे.
हे ही वाचा:
जम्मू- काश्मीर विधानसभा निवडणुकीमध्ये ‘गुलाबी मतदान केंद्रां’ची चर्चा!
जम्मू- काश्मीरमध्ये दुसऱ्या टप्प्याचे मतदान; २३९ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत होणार बंद
अक्षय शिंदेच्या वडिलांची हायकोर्टात धाव
‘धर्मनिरपेक्षता ही युरोपियन संकल्पना, भारतात याची गरज नाही’
आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाच्या उत्तराधिकारी म्हणून आतिशी यांची निवड केली. पुढे आतिशी यांनी २२ सप्टेंबर रोजी दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर आतिशी म्हणाल्या की, “मी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. प्रभू रामांना १४ वर्षांचा वनवास भोगावा लागला आणि भरताला राज्य ताब्यात घ्यावं लागलं. तेव्हा भरत यांना ज्या वेदना झाल्या त्या वेदना मी आज भोगत आहे. ज्याप्रमाणे भरताने सिंहासनावर प्रभू रामाचे जोडे ठेवले आणि १४ वर्षे राज्य कारभार केला त्याचप्रमाणे मी पुढील चार महिने दिल्लीचे सरकार चालवणार आहे.” यावरून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे.