विधानसभा अध्यक्ष पदावर जाधवांचा डोळा, पण काँग्रेसने फिरवला बोळा

विधानसभा अध्यक्ष पदावर जाधवांचा डोळा, पण काँग्रेसने फिरवला बोळा

महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनात तालिका अध्यक्ष म्हणून कामकाज पाहणारे शिवसेना नेते भास्कर जाधव हे चांगलेच गाजले. भारतीय जनता पार्टीच्या १२ आमदारांवर शिवीगाळ केल्याचे आरोप करत त्यांचे निलंबन करणाऱ्या जाधवांना आता विधानसभा अध्यक्ष बनण्याचे वेध लागले आहेत. पण त्यांच्या अपेक्षांवर काँग्रेसने पाणी फिरवले आहे.

भास्कर जाधव यांनी तालिका अध्यक्ष म्हणून केलेल्या कामकाजाची चांगली चर्चा झाली. महाविकास आघाडीतल्या अनेक नेत्यांनी आपले कौतुक केल्याचा दावा जाधव यांनी केला आहे. तर विधानसभेचे रिक्त असलेले अध्यक्ष पद आपल्याला मिळावे असे अनेकांचे मत असल्याचेही जाधव सांगताना दिसत आहेत. महाविकास आघाडीतील सहयोगी पक्ष तयार असतील तर आपण ही जबाबदारी स्वीकारायला तयार आहोत असे जाधव म्हणाले आहेत.

महाविकास आघाडीमध्ये ठरलेल्या सूत्रानुसार विधानसभेचे अध्यक्षपद हे सध्या कॉंग्रेस पक्षाकडे आहे. काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष नाना पटोले हे या पदावर विराजमान होते. पण त्यांनी प्रदेशाध्यक्ष होताना राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झाले. त्यामुळे विधानसभेचे पुढचे अध्यक्ष काँग्रेस पक्षाचेच असावेत अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे.

हे ही वाचा:

उत्तर प्रदेशात ‘चप्पा चप्पा भाजपा’…ब्लॉक अध्यक्ष निवडणुकीत घवघवीत विजय

नाना पटोले हे महाराष्ट्राचे पप्पू

अखेर मेस्सी जिंकला!

बैलगाडीलाही पेलवेना काँग्रेसचा भार

पण विधानसभा अध्यक्षपदावर नजर ठेवून बसलेल्या भास्कर जाधव यांनी यावरही एक तोडगा सुचवला आहे. तो म्हणजे शिवसेना आणि काँग्रेसने वन मंत्री आणि विधानसभा अध्यक्ष पदाची देवाण घेवाण करावी. शिवसेना नेते संजय राठोड यांचे नाव पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात समोर आल्यामुळे त्यांना वन मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे राज्यातील वन मंत्री पद सध्या रिक्त आहे. तर शिवसेनेने हे पण काँग्रेसला द्यावे आणि विधानसभा अध्यक्ष पद स्वतःकडे घ्यावे असे भास्कर जाधव यांनी सुचवले आहे. पण मनात मांडे खाणाऱ्या जाधवांची काँग्रेसने पुरी हवा काढली आहे.

आमच्याकडेही अनेक जाधव आहेत
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी या सर्व विषयावर प्रतिक्रिया दिली आहे. “भास्कर जाधव यांनी अधिवेशनात चांगले काम केले. पण म्हणून लगेच सोबत त्यांनाच द्यावे असे काही नाही. आमच्या पक्षातही अनेक जाधव आहेत. ते सक्षमपणे हे काम करू शकतात.” असे थोरात यांनी म्हटले आहे. तर “जागा वाटपात हे पद काँग्रेसच्या वाट्याला आले असून त्यात बदल करण्याच्या संदर्भात कोणतीही चर्चा अथवा तसा विचार झालेला नाही.” असे थोरात यांनी सांगितले.

काँग्रेसच्या या प्रतिक्रियेमुळे विधानसभा अध्यक्ष पदावर डोळा ठेवलेल्या भास्कर जाधवांच्या अपेक्षांवर बोळा फिरला आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत शिवसेनेत उडी घेतली. महाविकास आघाडीच्या सत्ता वाटपात आपल्याही वाट्याला एखादे मंत्रीपद येईल अशी जाधव यांना अपेक्षा होती. पण तसे काही घडले नाही. त्यामुळे जाधव हे अस्वस्थ झाले असून आता रिक्त झालेल्या विधानसभा अध्यक्ष पदावर भास्कर जाधव यांचा डोळा असल्याचे म्हटले जात आहे.

Exit mobile version