तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांचा उल्लेख परदेशी असा केल्याबद्दल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनी शुक्रवारी त्यांची माफी मागितली. त्यांच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर टीकेची झोड उठली होती. ‘डेरेक ओब्रायन यांच्याबद्दल माझ्याकडून अनवधानाने परदेशी म्हणून उच्चारलेल्या शब्दाबद्दल मी खेद व्यक्त करत आहे,’ अशा शब्दांत चौधरी यांनी ‘एक्स’वर माफी मागितली आहे. ओब्रायन यांनीही चौधरी यांची माफी स्वीकारल्याचे समजते.
पश्चिम बंगालमधील सिलिगुडी येथे गुरुवारी पत्रकारांशी बोलताना चौधरी यांनी ‘डेरेक ओब्रायन हे परदेशी आहेत. त्यांना बरेच काही माहिती असते. त्यांना विचारा,’ असे बोलले होते. पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडीतील जागावाटपाची चर्चा फिसकटण्यामागे अधीर रंजन कारणीभूत असल्याचा आरोप डेरेक ओब्रायन यांनी केला होता.
हे ही वाचा:
प्रथमच नायट्रोजन गॅस देत अमेरिकेत देण्यात आला मृत्युदंड!
दिल्लीच्या सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या मुलाची हत्या करून तलावात फेकले
महायुती सरकारने आरक्षणाबाबात दिलेला शब्द पूर्ण केला
बंगालमधील राहुल गांधी यांच्या यात्रेला परवानगी नाही
तसेच, अधीर रंजन हे भाजपच्या वतीने काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. दिल्लीतही ओब्रायन यांनी ‘बंगालमध्ये आघाडी न होण्याची तीन कारणे आहेत. ती म्हणजे अधीर रंजन चौधरी, अधीर रंजन चौधऱी आणि अधीर रंजन चौधरी,’ असे म्हटले होते. तसेच, गेली दोन वर्षे चौधरी हे भाजपच्या भाषेत बोलत आहेत. त्यांनी बंगालला केंद्राकडून निधी मिळत नसल्याच्या मुद्द्यावर एकदाही आवाज उठवला नाही, असा आरोप केला होता.
तर, ममता बॅनर्जी यांनी लोकसभा निवडणुका तृणमूल काँग्रेस एकट्याने लढवेल, असे जाहीर केल्याने चौधरी यांनी बॅनर्जी यांच्यावर टीका केली होती. तृणमूल काँग्रेसने राज्यातील सर्वच्या सर्व ४२ लोकसभेच्या जागा लढवण्याचा निर्धार केला आहे. त्यात स्वतः रंजन यांचा बालेकिल्ला मानला जाणारा बऱ्हामपूर मतदारसंघही आहे.