मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. १९८२ मध्ये मराठा आरक्षणासाठी स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी मंत्रालयावर मोर्चा काढला होता. पण काँग्रेसने त्यांच्या मागण्यांचा साधा विचारही केला नाही. अण्णासाहेब पाटलांची हत्या करण्याचं काम काँग्रेसनं केलं आहे, असा गंभीर आरोप विनायक मेटे यांनी केला. तसेच उद्याचा मोर्चा हा १०० टक्के निघणार असून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देणार आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
विनायक मेटे यांनी उद्या शनिवारी बीडमध्ये मराठा मोर्चाचं आयोजन केलं आहे. या मोर्च्याच्या तयारीची माहिती देण्यासाठी मेटे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. १९८२ मध्ये मराठा आरक्षणासाठी स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी मंत्रालयावर मोर्चा काढला होता. पण काँग्रेसने त्यांच्या मागण्यांचा साधा विचारही केला नाही. अण्णासाहेब पाटलांची हत्या करण्याचं काम काँग्रेसनं केलं आहे, असं सांगतानाच मराठा आरक्षणांसदर्भात बळी घेण्याचं पहिलं काम काँग्रेसनं केल आहे. हा माझा आरोप आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या या काँग्रेसच्या हत्याच आहेत, असा गंभीर आरोपही मेटेंनी केला.
उद्याचा मोर्चा हा १०० टक्के निघणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाला आम्ही धडक देणार आहोत. उद्याचा मोर्चा हा मुका मोर्चा नसेल तर तो बोलका असेल. सरकारच्या चूका दाखवणारा असेल. उद्या आम्ही आमची भूमिका जाहीर करू. उद्या मोर्चाला येताना कोणी अडवलं तर त्यांना आम्ही परत मोर्चात आणण्याचं काम करणार. कोणीही घाबरण्याचं कारण नाही. मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी व्हा. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा आणि कोणीही कायदा हातात घेऊ नये, असं आवाहनही त्यांनी केलं.
उद्या ५ जून रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकूल येथून मराठा क्रांती संघर्ष मोर्चा निघेल. या मोर्चाला जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. नरेंद्र पाटील या मोर्चासाठी कालपासून तयारी करत आहेत. बीड जिल्ह्यातून या मोर्चाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने अनेकांच्या पोटात पोटशूळ उठलं आहे. बीड जिल्ह्याचा संबंध नसताना काही उपटसुंभ लोक इथे येऊन बोलत आहेत. काही लोकांना हाताशी धरून काँग्रेसचा हा विरोध सुरू आहे. महाराष्ट्राचं नावं काढलं की काँग्रेसच्या पोटात दुखतं. मराठा समाजाचं नाव घेतलं की काँग्रेसचे वांदे व्हायला लागतात, अशी टीका त्यांनी केली.
हे ही वाचा:
आता मागासवर्ग आयोग नेमणं हे ठाकरे सरकारला उशिरा सूचलेलं शहाणपण
ठाकरे सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि अनेक सुपर मुख्यमंत्री
सुशांत सिंग राजपूत प्रकरण, अंगरक्षकही होणार साक्षीदार
ठाकरे सरकारमधील अनलॉक विसंवादाचा दुसरा अंक आज?
काँग्रेसला मराठा समाजाची कावीळ आहे. काही लोक विधानपरिषद आली की मोर्चा काढतात, असे आरोप होतात. काही लोकांना रुसवे-फुगवे केले की विधानपरिषद सुद्धा मिळत नाही. अनेक लोक इतर जिल्ह्यात पर्यटनाला जाऊन आपलं अस्तित्व आहे का बघत आहेत. जे कोणी या जिल्ह्यात पर्यटनासाठी येताय त्यांनी आपला विचार करावा, असा इशाराही त्यांनी दिला.