महापालिका निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला कापरं भरलंय

महापालिका निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला कापरं भरलंय

“मुंबई महापालिका निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या असताना मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी प्रभाग पुनर्रचनेबाबत केलेली विधाने म्हणजे निवडणुकीत होणारा संभाव्य पराभव ओळखून कारणे देण्याचा प्रकार आहे.” अशी टीका भाजपाचे आमदार आणि मुंबई भाजपाचे प्रभारी अतुल भातखळकर यांनी केली आहे. भाई जगताप यांनी प्रभाग पुनर्रचनेवरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले होते. त्याचा समाचार घेताना भातखळकर यांनी काँग्रेसवर तुफानी टीका केली.

“राज्यात शिवसेनेसोबत सत्तेवर असलेला काँग्रेस पक्ष महापालिकेत मात्र स्वबळाचे हाकारे देत आहे. नालेसफाईत १०० कोटीचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. नालेसफाईचे टेंडर काढताना स्टँडींगमध्ये टक्केवारीचे अंडरस्टॅण्डींग करायचे आणि बाहेर येऊन भ्रष्टाचाराची बोंब ठोकायची ही धूळफेक लोकांच्या लक्षात आलेली आहे. टक्केवारीतला पुरेसा वाटा मिळाला नसल्यामुळे काँग्रेसची तगमग होत असावी.” अशी जळजळीत टीका भातखळकरांनी केली.

हे ही वाचा:

मॉडर्ना ठरणार भारतातील चौथी कोरोना लस

लष्कर ए तैय्यबाच्या दहशतवाद्याचा भारतीय जवानांनी केला खात्मा

‘हा’ अपमान पुणेकर लक्षात ठेवतील

चीनी सीमेवर भारताने तैनात केले ५० हजार जवान

“राज्याच्या सत्तेत एकत्र मलई ओरपणारा काँग्रेस पक्ष महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतो आहे. परंतु विश्वासघाताने राज्यात मिळवलेल्या सत्तेचा जाब लोक महापालिकेच्या निवडणुकांमध्ये विचारल्याशिवाय राहणार नाही या भीतीने काँग्रेसला कापरे भरले आहे. त्यातून भाई जगताप आता देवेंद्र फडणवीस यांच्या काळात झालेल्या प्रभाग पुनर्रचनेवर ठपका ठेवत आहेत. भाजपाने चुकीच्या पद्धतीने प्रभागांची पुनर्रचना केल्याचा आरोप भाई जगताप यांनी केला आहे. परंतु पुनर्रचना कोणताही राजकीय पक्ष करीत नसून राज्य निवडणूक आयोग करतो, एवढे सामान्य नागरीक शास्त्र, जगताप यांना ठाऊक नाही याचे आश्चर्य वाटते,” अशी टिप्पणीही भातखळकरांनी केली.

Exit mobile version