भाजपाच्या शिष्टमंडळाने आज राज्यपालांची भेट घेतली. या भेटीनंतर भाजपाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारमधील सर्व पक्षांवर हल्ला चढवला. “संजय राऊत हे काही मोठे नेते नाहीत की मी त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं द्यावीत.” असे सांगत त्यांनी राऊतांवरही हल्ला चढवला. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जर या गंभीर विषयावर बोलणार नसतील तर राज्यपालांनी त्यांच्याकडून अहवाल मागवावा अशी विनंती आम्ही राज्यपालांना केली आहे. तसे अधिकार राज्यपालांकडे आहेत. काँग्रेस पक्षानेही स्पष्ट करावं की त्यांना किती ‘कट’ मिळत होता?” असे फडणवीस म्हणाले.
“काँग्रेस पक्ष हा या संपूर्ण प्रकरणातून गायब झालेला दिसत आहे. काँग्रेस पक्षाने स्पष्ट करावं की, त्यांना या खंडणीतील किती हिस्सा मिळत होता. या तिन्ही पक्षांना हा सर्व प्रकार माहित होता. त्यामुळे काँग्रेस पक्षाने या बाबतीत मौन पाळून चालणार नाही. या सर्व प्रकारामध्ये काँग्रेस अस्तित्वहीन पक्ष झाला आहे.” अशा शब्दात काँग्रेस पक्षावर आणि काँग्रेसच्या मौन पाळण्याच्या धोरणावर फडणवीसांनी टीका केली.
हे ही वाचा:
सचिन वाझेच्या चौकशीतून पुढे येणार ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याचे नाव?
अमित शहांकडे आहेत आणखी काही लेटर बॉम्ब
“आपण दाबलेला रिपोर्ट फडणवीसांनी बाहेर कसा काढला यावर मुख्यमंत्री – गृहमंत्र्यांची चर्चा”
“संजय राऊत हे काही मोठे नेते नाहीत की त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मी द्यावीत. काल मी दिलेली माहिती हा लवंगी फटाका आहे की ऍटम बॉम्ब आहे हे लवकरच कळेल. जर का तो खरंच लवंगी फटाका असेल तर त्यासाठी एवढं घाबरण्याचं कारण काय? जर तो खरंच लवंगी फटाका असेल, तर ऑगस्ट २०२० पासून ती माहिती लपवून का ठेवली? संजय राऊत यांच्याकडे खूप वेळ असतो त्यामुळे ते त्यांना हवं ते बोलत असतात.” अशी सणसणीत टीका फडणवीसांनी संजय राऊत यांच्यावर केली.
भाजपाच्या शिष्टमंडळाने राज्यपालांकडे शंभरपेक्षा जास्त प्रकरणं सोपवली आहेत, ज्यामध्ये ठाकरे सरकारने केलेला बदल्यांचा भ्रष्टाचार समोर येत आहे. अशी माहिती भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी याच पत्रकार परिषदेतून दिली.