उत्तर प्रदेशसह पाच राज्यांत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर ‘जी २३’ मधील नेत्यांनी पुन्हा एकदा गांधी कुटुंबावर निशाणा साधला आहे. बुधवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्या घरी १८ नेत्यांची बैठक झाली, ज्यामध्ये काही लोक जी २३ चा भाग आहेत, तर अनेक नवीन नेतेही यात सहभागी झाले होते.
या बैठकीबाबत असे बोलले जात होते की, काँग्रेसमध्ये मोठे बदल करण्याची मागणी करत काही ठराव या नेत्यांनी संमत केले आहेत. या जी २३ नेत्यांनी सामूहिक आणि सर्वसमावेशक नेतृत्वाची हाक दिली आहे. मात्र या बैठकीत गांधी घराण्याव्यतिरिक्त काँग्रेस अध्यक्षाची नियुक्ती किंवा संघटना निवडणुकीबाबत कोणतीही मागणी करण्यात आलेली नाही.
या नेत्यांनी काँग्रेसने आपल्या विचारसरणीशी सहमत असलेल्या पक्षांशी युती करावी असा सल्ला पक्षाला दिला आहे. विशेषत: २०२४ च्या निवडणुकांसाठी ही सूचना करण्यात आली आहे. या बैठकीत एकूण सहा राज्यांचे नेते सहभागी झाले होते. गांधी घराण्यावर थेट हल्ला करणाऱ्या कपिल सिब्बल यांच्याशिवाय आनंद शर्मा आणि पृथ्वीराज चव्हाण हेही त्यात होते. हे सर्व नेते जी २३ गटाचा भाग आहेत, ज्यांनी दोन वर्षांपूर्वी सोनिया गांधींना पत्र लिहून बदलांची मागणी केली होती.
हे ही वाचा:
हिजाब प्रकरणी न्यायालयाच्या निर्णयाविरोधात आज मुस्लीम संघटनांचा ‘कर्नाटक बंद’
गोव्यामध्ये मुख्यमंत्रीपदासाठी प्रमोद सावंत यांच्यावर विश्वास
‘एएसआय’ ला पोलीस आयुक्तांची होळीची खास भेट
जनरल बिपिन रावत यांच्या नावाने ‘चेअर ऑफ एक्सलन्स’
बुधवारी झालेल्या या बैठकीत अनेक नवीन नेत्यांची भर पडली आहे. या बैठकीला भूपिंदर सिंग हुड्डा, राज बब्बर, शंकर सिंह वाघेला आणि मणिशंकर अय्यर हे देखील उपस्थित होते. आता हे नेते जी २३ मध्ये सामील झाले आहेत कि नाही हे समोर आलेले नाही. दरम्यान या बैठकीनंतर इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत कपिल सिब्बल यांनी गांधी कुटुंबावर थेट हल्ला चढवला.