“नाना पटोले यांच्याविरोधातील काँग्रेसमधील तीव्र असंतोष काँग्रेसश्रेष्ठींना जाणवायला लागला आहे,” असा गौप्यस्फोट कॉंग्रेस नेते आशिष देशमुख यांनी केला आहे. आशिष देशमुख हे कॉंग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. नाना पटोले यांच्याबाबतीत लवकरच लवकरच काँग्रेस श्रेष्ठी निर्णय घेतील, असंही आशिष देशमुख म्हणाले. ‘एबीपी माझा’शी बोलताना आशिष देशमुख यांनी हे वक्तव्य केलं.
‘राज्यातील कॉंग्रेसचा प्रदेशाध्यक्ष लवकरच बदलला जाईल. प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी सर्वात आधी मीच केली होती. तेव्हा माझ्यावर ताशेरे ओढले गेले. मात्र, नाना पटोले यांच्याविरोधातला काँग्रेसमधील तीव्र असंतोष काँग्रेस श्रेष्ठींना जाणवायला लागला आहे. त्यामुळे लवकरच काँग्रेस श्रेष्ठी त्या संदर्भात अंतिम निर्णय घेतील,’ अशी टीका आशिष देशमुख यांनी केली.
‘राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाची माफी मागण्याची मागणी मी केली होती. राहुल गांधींनी ते ऐकले असते, तर ते खासदारकीपासून वंचित राहिले नसते. त्यांच्यावर राजकारणातून बाद होण्याची परिस्थिती आली नसती. देशातील ५४ टक्के ओबीसींविरोधात जर काँग्रेस आणि गांधी परिवार वागणार असेल तर ओबीसी भाजपाच्या पाठिशी एकत्रित राहिल्याशिवाय राहणार नाही,’ अशी टीका आशिष देशमुख यांनी राहुल गांधी यांच्यावर केली.
हे ही वाचा:
पळवून नेलेल्या हिंदू तरुणीचा ‘निकाह’ पोलिसांनी रोखला
मरीन ड्राईव्ह येथील वसतिगृहातील मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत
बिपरजॉयचं आगमन झालं आणि ७०० बाळांनी जन्म घेतला
मुख्यमंत्र्यांबाबत वादग्रस्त ट्वीट करणाऱ्याकडे ठाणे पोलिसांनी मागितला नंबर
दरम्यान, आशिष देशमुख १८ जून रोजी भाजपामध्ये घरवापसी करणार आहेत. नागपूर जवळच्या कोराळी येथील नैवेद्यम सभागृहात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आशिष देशमुख भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत.
“पक्षाची इच्छा असेल की मी संघटनात्मक काम करावे तर मी कार्यकर्ता म्हणून काम करेन. ओबीसींच्या कल्याणासाठी आणि विदर्भाच्या हितासाठी आशिष देशमुख भाजपमध्ये काम करेल,” असं मत आशिष देशमुख यांनी व्यक्त केले.