लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच सलग तिसऱ्यांदा काँग्रेसला १०० पेक्षा कमी जागा मिळाल्या आहेत, असा सणसणीत टोला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला लगावला आहे. लोकसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि विरोधकांवर सडकून टीका केली.
काँग्रेस पक्षाला सलग तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीत १०० च्या आत जागा मिळाल्यानंतर आणि तिसऱ्यांदा पराभूत झाल्यानंतर काँग्रेसने पराभव स्वीकारून आत्मपरीक्षण केलं असतं तर बरं झालं असतं. मात्र, काँग्रेस आणि त्यांची इकोसिस्टिम आमचाच पराभव झाल्याचं चित्र रंगवण्यात व्यस्त आहे, असा सणसणीत टोला नरेंद्र मोदींनी त्यांच्या भाषणातून लगावला आहे.
“लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच सलग तिसऱ्यांदा काँग्रेसला १०० पेक्षा कमी जागा मिळाल्या. सलग तिसऱ्यांदा पराभव पत्करावा लागला. त्यानंतर काँग्रेसने आपला पराभव स्वीकार करून, जनादेश मान्य करून आत्मचिंतन केलं असतं तर बरं झालं असतं. मात्र सध्या त्यांच्याकडून शीर्षासन घालण्याचे प्रकार सुरू आहेत. काँग्रेस आणि त्यांची इकोसिस्टिम आमचाच पराभव झालाय, असं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे,” अशी टीका नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर केली आहे.
हे ही वाचा:
“पूर्वी बेशरमपणे मान्य केलं जायचं की, १ रुपयात ८५ पैशांचा घोटाळा होतोय”
उत्तर प्रदेशात सत्संग कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीत २७ जणांचा मृत्यू
धर्मांतर होत राहिल्यास देशातील बहुसंख्य लोकसंख्या एक दिवस अल्पसंख्याक होईल
बार्बाडोसमध्ये अडकलेला भारतीय संघ विश्वचषक घेऊन मायदेशी येण्यास सज्ज!
नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांना खोचक शब्दांत सुनावले आहे. “एक मुलगा ९९ गुण दाखवून मिठाई वाटत फिरत होता. लोकही शाबासकी द्यायचे. मात्र, जेव्हा त्याच्या शिक्षकांनी त्याला पाहिलं तेव्हा त्यांनी याला १०० पैकी ९९ नाही तर ५४३ पैकी ९९ गुण मिळाले आहेत, असं सांगितलं,” अशा शब्दात नरेंद्र मोदींनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांचा खरपूस समाचार घेतला. नरेंद्र मोदी यांनी पुढे सांगितले की, “१९८४ नंतर आतापर्यंत १० लोकसभेच्या निवडणुका झाल्या आहेत. मात्र त्यामध्ये एकदाही काँग्रेसला २५० जागाही जिंकता आलेल्या नाहीत.”