नागपूर महानगर पालिकेची शनिवारी २९ जानेवारी रोजी एक विशेष ऑनलाईन सभा पार पडली. या सभेत एका नगरसेवकाचे धक्कादायक वर्तन समोर आले आहे. पालिकेच्या विशेष सभेत काँग्रेसचे नगरसेवक रमेश पुणेकर हे सिगारेट ओढत असल्याचे समोर आले आहे.
नागपूर मधील कचऱ्याचा प्रश्न तसेच कचरा संकलन करणाऱ्या दोन खासगी कंपन्यांच्या कारभारासंदर्भात चर्चा करण्यासाठी शनिवारी महापालिकेची विशेष ऑनलाइन सभा बोलवण्यात आली होती. या ऑनलाईन सभेत कचरा संकलन करणाऱ्या दोन्ही कंपन्यांच्या कारभारासंदर्भात चौकशी समितीचा अहवाल मांडला गेला. त्यानंतर अहवालावर चर्चा सुरू असताना काँग्रेसचे नगरसेवक रमेश पुणेकर हे सिगारेट ओढत असल्याचे दिसून आले.
रमेश पुणेकर हे या सभेसाठी त्यांच्या कार्यालयातून ऑनलाईन सहभागी झाले होते. मात्र, सभा सुरू असताना त्यांचा कॅमेरा चालू असल्याने ते सिगारेट ओढताना कॅमेऱ्यात दिसून आले. ऑनलाइन सभेत माझा कॅमेरा सुरू आहे, हे लक्षात आले नव्हते. त्यामुळे ही चूक झाल्याची प्रतिक्रिया रमेश पुणेकर यांनी दिली आहे.
हे ही वाचा:
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर मणिपूरमध्ये पहिली मालवाहू ट्रेन
सरकारने वाईन सर्वसामान्य दुकानात आणली…म्हणून त्यांनी परत केला पुरस्कार
पालकमंत्री अस्लम शेख यांच्या बॅनरबाजीने नगरसेवक वैतागले!
जीवाच्या भीतीने कॅनडाचे राष्ट्रपती अज्ञातवासात
दरम्यान, रमेश पुणेकर या आधीही वादात सापडले होते. काही वर्षांपूर्वी नागपूर पोलिसांनी एका जुगार अड्ड्यावर धाड टाकली असताना रमेश पुणेकर त्या ठिकाणी जुगार खेळताना आढळून आले होते. त्यानंतर आता एखाद्या लोकप्रतिनिधीने ऑनलाइन सभा सुरू असताना असे वर्तन केल्याने ते अडचणीत आले आहेत. पालिकेचा कारभार सुरू असताना असे वर्तन करणे योग्य आहे का? असा प्रश्न आता सामान्य जनतेकडून विचारला जात आहे.