काँग्रेसची प्रसाद काथेंवर आगपाखड
औरंगाबादमध्ये व्हेंटिलेटर्सचा पुरवठा शासकीय रुग्णालयातून खासगी रुग्णालयांना केला गेल्याच्या आरोपांमुळे महाविकास आघाडीत चांगलीच खळबळ उडाली. जय महाराष्ट्र चॅनेलचे संपादक प्रसाद काथे यांनी या प्रकरणासंदर्भात केलेली ट्विट्स चांगलीच झोंबल्यामुळे काँग्रेसने त्यांच्यावर आगपाखड केली. ट्विटरवर तर काँग्रेस आणि काथे यांच्यात ट्विटची खडाजंगी रंगली. खरे तर, ज्या वैद्यकीय रुग्णालयातून ही व्हेंटिलेटर्स गेली त्यांच्याकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही. पण काँग्रेसकडून लागलीच काथे यांच्या ट्विटला लक्ष्य करण्यात आले.
काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी तर काथे यांना पत्रकारितेची तत्त्वेच समजावण्याचा प्रयत्न केला. त्यावरून पत्रकारांनी चायबिस्कुट पत्रकार व्हावे नाहीतर त्यांची गणना भक्त पत्रकार अशी केली जाईल, असाच सूर एकप्रकारे त्यातून उमटत होता.
काथे यांनी आपल्या ट्विटमध्ये औरंगाबादच्या सरकारी रुग्णालयात किती व्हेंटिलेटर्स आले, किती खासगी रुग्णालयांना देण्यात आले, याची सविस्तर माहिती दिली. औरंगाबाद वैद्यकीय महाविद्यालयाला ५० व्हेंटिलेटर्स पाठविण्यात आले पण त्यापैकी ४८ व्हेंटिलेटर्स स्थानिक प्रशासनाकडून सूचना न मिळाल्याने पडून असल्याचे ट्विट काथे यांनी केले होते. व्हेंटिलेटर नादुरुस्त असल्याच्या तक्रारीही करण्यात आल्या होत्या. तसे ते व्हेंटिलेटर नादुरुस्त नव्हते. उलट व्हेंटिलेटर उत्पादकाच्या सल्ल्याशिवाय संयंत्र वापरण्याचा प्रयत्न झाल्याचे आढळले होते. योग्य पद्धतीने व्हेंटिलेटर न वापरल्याने त्यात बिघाड झाल्याचेही स्पष्ट झाले.
काथे यांनी केलेल्या या ट्विटनंतर त्यांचे दावे कसे फोल आहेत, हे सांगितले जाऊ लागले. त्यात काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, काथे यांनी दिलेले हे वृत्त एकतर्फी असून पत्रकारितेच्या तत्त्वात बसणारे नाही.
यावर काथे यांचे म्हणणे आहे की, खासगी रुग्णालयांना परस्पर केंद्राने दिलेले व्हेंटिलेटर देण्याची बाब केंद्राने प्रसिद्ध केलेल्या कागदपत्रांतूनच समोर येते. त्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केल्यावर त्याचे सरकारकडून समाधानकारक उत्तर नाही. खासगी रुग्णालयांवर मेहेरनजर का, जर केंद्राने दिलेले व्हेंटिलेटर खासगी रुग्णालयांना द्यायची असेल तर त्यासाठी रुग्णांना सवलत काय मिळणार? याचे उत्तर हवंय. पण त्याचे उत्तर कुणीही देत नाही.