मुस्लिम आरक्षणासाठी काँग्रेसची बांग

मुस्लिम आरक्षणासाठी काँग्रेसची बांग

बहुचर्चित अशा मुस्लिम आरक्षणासाठी काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा बांग दिली आहे. महाराष्ट्रात मुस्लिम आरक्षण लागू करण्यात यावे असा ठराव महाराष्ट्र काँग्रेस संसदीय मंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. आता या नव्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारचे मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर येणार का याकडे सर्वांचे लक्ष आहे.

मंगळवार दिनांक २३ फेब्रुवारी रोजी काँग्रेसची महाराष्ट्राच्या संसदीय मंडळाची बैठक मुंबई येथे पार पडली. काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पदभार स्विकारल्या नंतरची ही पहिलीच संसदीय मंडळाची बैठक होती. या बैठकीला महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी प्रभारी एच. के. पाटील, विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण असे तीन माजी मुख्यमंत्री यांच्या सोबत इतर महत्वाचे नेते उपस्थित होते. याच बैठकीत काँग्रेस पक्षाने मुस्लिम आरक्षणाशी संबंधित ठराव मंजूर केला आहे. राज्यातील मराठा समाज आणि मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यात यावे असे या ठरावात म्हटले आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार सर्व समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. हा महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम असून मुसलमान समाजाला आरक्षण देणे हा त्याचाच एक भाग आहे असे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे. आता यावर काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेची नेमकी काय भूमिका असणार याची चर्चा आहे.

स्थानिक परिस्थिती पाहून आघाडीचा निर्णय
आगामी महापालिका निवडणुकीत स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन आघाडीबाबत निर्णय घेतला जाईल असे काँग्रेसच्या बैठकीत ठरले आहे. येत्या दीड वर्षात राज्यात १० महानगरपालिका, २७ जिल्हा परिषदा आणि ९७ नगर परिषदा, नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. राज्यात महाविकास आघाडी म्हणून तीन पक्ष एकत्र सत्ता राबवत असेल तरी स्थानिक आघाडीचा निर्णय मात्र स्थानिक परिस्थितीनुसारच घेतला जाईल असे धोरण काँग्रेसने ठरवले आहे.

Exit mobile version