‘देशासाठी दान द्या’ म्हणत काँग्रेसकडून जनतेकडे पैशांची मागणी

निधीची कमतरता; १३८ व्या वर्धापनदिनानिमित्त राबवणार मोहीम

‘देशासाठी दान द्या’ म्हणत काँग्रेसकडून जनतेकडे पैशांची मागणी

काँग्रेसने आता देशातील जनतेशी जोडण्यासाठी त्यांच्याकडून ऑनलाइन पैसे घेण्याची नवी मोहीम सुरू केली आहे. अखिल भारतीय काँग्रेसचे खजिनदार अजय माकन यांनी यासंदर्भातील घोषणा केली. डोनेट फॉर देश (देशासाठी दान) अशा मथळ्याखाली जनतेकडून पैशांची देणगी अपेक्षित आहे. या मोहिमेच्या अंतर्गत विविध योजना कार्यान्वित करण्यात येणार आहेत. या देशासाठी दान या योजनेच्या माध्यमातून काँग्रेसला १३८ वर्षे झाल्याच्या निमित्ताने १३८ रुपये किंवा १३८० रुपये किंवा १३८०० रुपये किंवा त्यापेक्षा अधिक अशा स्वरूपात ही देणगी द्यायची आहे.

 

शनिवारी माकन यांनी ही घोषणा करताना सांगितले की, या क्राउड फंडिंगच्या माध्यमातून १८ डिसेंबरपासून ही पैसे गोळा करण्याची मोहीम सुरू होईल. टिळक स्वराज फंड या महात्मा गांधींच्या १९२०-२१मधील मोहिमेच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम काढण्यात आल्याचे माकन म्हणाले.

हे ही वाचा:

बडतर्फ पोलीस अधिकारी सुनील मानेचा जामीन अर्ज फेटाळला

मुंबई इंडियन्सची धुरा हार्दिक पंड्याच्या हाती!

‘राज्य मासा’ असलेल्या पापलेट माशासाठी शासनाचे पाऊल

धोनीच्या ७ क्रमांकाच्या जर्सीने ‘पाठ’ सोडली!

नवी दिल्ली पत्रकार परिषदेत माकन यांनी यासंदर्भात घोषणा केली. त्यावेळी काँग्रेस नेते के.सी. वेणुगोपालही उपस्थित होते. वेणुगोपाल म्हणाले की, महात्मा गांधींच्या ऐतिहासिक टिळक स्वराज फंड या मोहिमेतून आम्ही प्रेरणा घेतली आहे. पक्षाला बळकटी देण्यासाठी ही योजना असल्याचेही ते म्हणाले.

 

माकन यांनी सांगितले की, या पैशातून भारताच्या भल्यासाठी काँग्रेस काम करू शकणार आहे. शिवाय, काँग्रेसही त्यातून बळकट होऊ शकेल. १८ डिसेंबरला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन होईल. माकन म्हणाले की, काँग्रेसचे राज्यस्तरावरील पदाधिकारी, निवडून आलेले लोकप्रतिनिधी, जिल्हा काँग्रेस, प्रदेश काँग्रेस, अखिल भारतीय काँग्रेसचे पदाधिकारी यांनी प्रत्येकी १३८० रुपये द्यायचे आहेत. शिवाय, संभाव्य देणगीदारांची निवड करून त्यांच्याकडूनही देणग्या गोळा कराव्यात.

 

सध्या काँग्रेसला आर्थिक पुरवठ्याची कमतरता भासत आहे. २०२३मध्ये काँग्रेसकडे असलेली संपत्ती ८०५.६८ कोटी इतकी असून त्या तुलनेत भाजपाकडे ६०४६.८१ कोटी इतकी रक्कम आहे. गेल्या काही वर्षात उद्योगांकडून काँग्रेसला मिळणाऱ्या निधीत सातत्याने घट होत आहे. याशिवाय, प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांना घराघरात जाऊन या मोहिमेची माहिती देण्याचे तसेच त्यातून देणग्या उभारण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येकाने आपल्या बूथ भागातील १० घरांवर लक्ष केंद्रित करायचे आहे. हे देणगीदार १८ वर्षांपेक्षा अधिक वयाचे असावेत आणि त्यांनी देणगी दिल्यावर त्यांना त्याचे प्रमाणपत्रही देण्यात येईल.

Exit mobile version