फडणवीसांच्या दारी राज्याचे कारभारी

फडणवीसांच्या दारी राज्याचे कारभारी

महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी आज महत्वाच्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. सुरुवातीला कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीस यांची सागर निवासस्थानी भेट घेतली. तर दुपारी काँग्रेस नेते राज्याचे महसूल बाळासाहेब थोरात आणि शिवसेना नेते परिवहन मंत्री अनिल परब हे फडणवीसांच्या भेटीला धावले. त्यामुळे फडणवीसांचे सागर हे निवासस्थान हे राज्यातील महत्वाच्या राजकीय घडामोडींचे केंद्र बनल्याचे दिसून आले.

गुरुवार, १८ नोव्हेंबर रोजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल झाले. राज्यात आगामी काळात विधान परिषदेच्या सहा जागांसाठी निवडणूक होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांचे बिगुल वाजले असून राजकीय पक्षांतर्फे उमेदवार घोषित केले जात आहेत. यापैकी काँग्रेस नेते शरद रणपिसे यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी काँग्रेसकडून दिवंगत काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. विधानपरिषदेची ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी आणि त्यातही विशेषतः काँग्रेस पक्ष आग्रही असल्याचे दिसत आहे. त्यासाठीच नाना पटोले यांनी फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली आहे.

हे ही वाचा:

महाराष्ट्रात ‘नाचलेल्या’ सपना चौधरीविरुद्ध अटक वॉरंट

गोपीचंद पडळकरांच्या जीवाला धोका; फडणवीसांचे पत्र

कोकणात शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी कलगीतुरा!

पवई येथील ह्युन्डाई कार सर्व्हिस सेंटर आगीच्या तडाख्यात

तर दुपारच्या वेळेत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि परिवहन मंत्री अनिल परब हे फडणवीसांच्या भेटीसाठी आले. या बैठकीतही विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध व्हावी या संदर्भात चर्चा करण्यात आली आहे. तर त्यासोबतच राज्यभर पेटलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या संदर्भातही बोलणी झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे बहुप्रलंबित एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा तिढा फडणवीसांच्या मध्यस्तीने सुटणार का आणि राज्यातील विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार का हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

Exit mobile version