कर्नाटकात १० मे रोजी झालेल्या मतदानानंतर एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला अनुकूल चित्र दिसले आहे. त्यात हे बहुतांश एक्झिट पोल काँग्रेस भाजपाच्या पुढे असेल असेच सांगत आहेत. काँग्रेस आणि भाजपा यांच्यात प्रचंड चुरस असेल पण काँग्रेसला तिथे निसटती आघाडी मिळू शकते, असे आकडे एक्झिट पोलमध्ये समोर येत आहेत.
कर्नाटकात एकूण २२४ जागांसाठी या निवडणुका होत असून त्यात ११३ जागी ज्यांना यश मिळेल त्यांना बहुमत असेल. ते पाहता त्याच्या जवळपास कोण जाणार याबद्दल उत्सुकता आहे. इंडिया टुडेने तर काँग्रेसला १२२ ते १४० या दरम्यानच्या जागा दिल्या असून भाजपाला ६२ ते ८० जागा दिल्या आहेत. जनता दल सेक्युलरला २०-२५ जागा देण्यात आल्या आहेत.
एबीपी न्यूज सी व्होटरने काँग्रेसला १०० ते ११२ जागा देत भाजपाला ८३-९५ जागा दिलेल्या आहेत. जनता दलाला २१ ते २९ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. झी न्यूज मार्टिझ एजन्सीने म्हटले आहे की, भाजपाला ७९ ते ९४ जागी यश मिळेल तर काँग्रेसला बहुमत मिळण्याची शक्यता आहे. त्यांना १०३ ते ११८ जागा मिळू शकतील. जनता दल सेक्युलरच्या पारड्यात लोक २५ ते ३३ जागा टाकतील असा अंदाज आहे.
टीव्ही ९ भारत वर्षने भाजपाला ८८ ते ९८ जागा दिल्या असून काँग्रेसला ९९-१०९ जागी यश मिळेल असे म्हटले आहे. तर जनता दलाला २१ ते २६ जागा मिळू शकतील. सुवर्ण न्यूज जन की बातने भाजपाच्या पारड्यात ९४ ते ११७ जागा दिल्या आहेत तर काँग्रेसला ९१ ते १०६ जागी यश मिळेल असा अंदाज वर्तविला आहे. जनता दलाला १४ ते २४ जागा मिळतील असे ते म्हणत आहेत.
हे ही वाचा:
डिझेलच्या गाड्या बंद करायच्या आहेत, पण तूर्तास नाही!
‘घटनातज्ज्ञां’ वर होईल का सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब?
सत्तासंघर्षाचा पेच उद्या सुटणार?
इस्लाम कबूल न केल्यामुळे पत्नीची केली हत्या
रिपब्लिक टीव्ही पी मार्कने भाजपाला ८५ ते १०० जागी जिंकण्याची संधी व्यक्त केली असून काँग्रेसच्या खात्यात ९४ ते १०८ जागा दिल्या आहेत. जनता दलाला २४ ते ३२ जागा देण्यात आल्या आहेत. न्यूज नेशनने मात्र या सगळ्यांपेक्षा वेगळा निकाल दिला असून त्यांनी भाजपाला ११४ या आकड्यांसह बहुमत मिळेल अशी शक्यता वर्तविली आहे तर काँग्रेसला मात्र ८६ जागी यश मिळेल असे म्हटले आहे. जनता दलालाही २१ जागांवर समाधान मानावे लागेल असे ते म्हणत आहेत. गेल्या निवडणुकांमध्ये भाजपाने १०४ जागी यश मिळविले होते तर काँग्रेसला ८० जागा मिळाल्या होत्या. मात्र आताच्या या एक्झिट पोलनुसार काँग्रेस समाधानकारक प्रगती करेल असे सांगितले जात आहे. आता प्रत्यक्ष १३ मे रोजी जेव्हा प्रत्यक्ष निकाल हाती येऊ लागतील तेव्हा यातील कुणाचे अंदाज खरे ठरतात किंवा सत्याच्या जवळ जातात हे स्पष्ट होईल.