कॉंग्रेसला पुन्हा राहुलच हवे

कॉंग्रेसला पुन्हा राहुलच हवे

देशातील प्रमुख विरोधी पक्ष म्हणून भूमिका बजावणे अपेक्षित असलेला कॉंग्रेस पक्ष सध्या अंतर्गत अडचणींना तोंड देत आहे. राष्ट्रीय अध्यक्षांची निवड हा कळीचा मुद्दा झाला असून या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनीच पुन्हा राष्ट्रीय अध्यक्ष पद स्वीकारावे असा ठराव दिल्ली प्रदेश कॉंग्रेसने पारित केला आहे.

रविवार दिनांक ३१ जानेवारी रोजी दुपारी ४ च्या सुमारास दिल्ली प्रदेश कॉंग्रेसची बैठक पार पडली. दिल्ली प्रदेश कॉंग्रेसचे कार्यालय असलेल्या राजीव भवनात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. दिल्ली प्रदेश कॉंग्रेसचे प्रभारी शक्तीसिंह गोहिल आणि दिल्ली प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष अनिल चौधरी यांनी या बैठकीचे नेतृत्व केले. या बैठकीला कॉंग्रेसचे विविध नेते, माजी मंत्री उपस्थित होते. 

या बैठकीत राहुल गांधी यांनीच पुन्हा कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची जबाबदारी स्विकारावी असा ठराव मांडण्यात आला. हा प्रस्ताव सर्वसंमतीने पारित झाला. 

कोविड-१९ महामारीत मृत्युमुखी पडलेल्या नेत्यांनी श्रद्धांजली वाहून या बैठकीला प्रारंभ झाला. या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीसोबतच शेतकरी आंदोलनावरही चर्चा करण्यात आली.

त्याबरोबरच या बैठकीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्याचीही मागणी करण्यात आली.

Exit mobile version