जयंतराव अभिनंदन, जातीसाठी माती खाल्लीत…
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी बलात्काराचा आरोप झालेल्या धनंजय मुंडे यांची जोरदार पाठराखण केली. मुंडेच्या ओबीसीपणाची ढाल करून त्यांनी त्यांचा बचाव तर केलेलाच आहे, शिवाय भाजपावर तोंडसुख घेतले आहे. ‘भाजपा ओबीसी नेत्यांची पाठराखण करीत नाही आम्ही करतो’, असे जयंत पाटलांनी ठणकावून सांगितले आहे. एबीपी माझाला प्रतिक्रीया देताना हे विधान केले आहे.
महाराष्ट्रात सत्ताधारी राजकीय नेत्यांवर भारतीय दंड विधानानुसार कारवाई होणार नसून जात पाहून कारवाई होणार असा पाटील यांच्या विधानाचा अर्थ आहे. धनंजय मुंडे हे ओबीसी समाजातील असल्यामुळे त्यांच्यावर बलात्काराचा आरोप झाला काय? असा प्रश्न पाटलांच्या विधानामुळे सर्वसामान्य माणसाच्या मनात निर्माण झालेला आहे.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष मेहबुब खानवरही बलात्काराचा आरोप झाला होता. त्याच्यावर कारवाई झालेली नाही, त्यामुळे मुंडे यांच्यावर कारवाईची शक्यता कमीच होती. पक्षाच्या बैठकीत मुंडे यांच्यावर कारवाई न करण्याचा निर्णय झाला. मुंडे यांच्या बचावानंतर मेहबुब खान यांच्यावर ते मुस्लीम असल्यामुळे कारवाई झाली नसावी असे मानायला वाव आहे.
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे सदा सर्वदा पुरोगामीपणाचे तुणतुणे वाजवत असतात परंतु त्यांचा पक्ष किती जातवादी आहे हे आजवर अनेकदा स्पष्ट झालेले आहे. पवारांनी वेळोवेळी पुणेरी पगडीवर शरसंधान करून त्यांचे पुरोगामीपण सिद्ध केले आहे. जयंत पाटलांनी धनंजय मुंडे यांना ओबीसीपणाचे कवच देऊन त्यावर फक्त शिक्कामोर्तब केले आहे.
मुंडे ओबीसी असल्यामुळे बहुधा अद्यापि त्यांच्यावर बलात्कार प्रकरणी एफआयआऱ झालेला नाही. जोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेवर आहे तो पर्यंत पक्षातील नेत्यांवर बलात्कार, खून असे आरोप झाल्यानंतरही कारवाई होणार नाही, त्यांची जात आणि धर्म पाहून त्यांना पाठीशी घातले जाईल असे दिसते.
राज्यातील दोन वरीष्ठ पोलिस अधिकारी काल गुरुवारी मुंडे प्रकरणी चर्चा करण्यासाठी शरद पवारांना भेटले. शरद पवार हे राज्याचे मुख्यमंत्री नाहीत की गृहमंत्री. पण कोणतेही पद नसताना ते राज्याचे सर्वाधिकारी झालेले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या रिमोट कण्ट्रोलवर नाके मुरडणारे पत्रकार पवारांच्या हाती असलेल्या या अनिर्बंध सत्तेबाबत मुग गिळून बसले आहेत. कायदा आणि सुव्यवस्था राज्य सरकारच्या अखत्यारीतला विषय आहे. गृहमंत्री याबाबत निर्णय घेतात. गृहमंत्री अनिल देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेस असल्यामुळे पोलिस बळाचा वापर फक्त विरोधकांना चिरडण्यासाठी होतो आहे. राज्यात बलात्काराच्या, खूनाच्या घटना सातत्याने घडत आहेत. कारण गुन्हेगारांना शासन न करता राजकीय सोय पाहून त्यांना पाठीशी घालण्याची सत्ताधा-यांची मनोवृत्ती आहे. जयंत पाटील यांनी मुंडेचे समर्थन करताना त्यांच्या जातीची ढाल करून हे स्पष्ट केले आहे. राज्यात कायदा सुव्यवस्थेची ऐशीतैशी झाली तरी चालेल पण पुरोगामीपणाचे नाव घेत जातीचे राजकारण सुरू राहीले पाहीजे हे सत्ताधारी पक्षाचे धोरण आहे.