‘कलम ३७० हटवल्याचा सामान्य काश्मिरींना लाभ’ – सरसंघचालक

‘कलम ३७० हटवल्याचा सामान्य काश्मिरींना लाभ’ – सरसंघचालक

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या विजयादशमीच्या उत्सवात बोलताना सुरक्षेच्या मुद्द्यावर भाष्य केले आहे. यावेळी बोलताना कलम ३७० हटवण्याचे तिथल्या स्थानिक नागरिकांना लाभ होत आहेत असे भागवत यांनी म्हटले आहे. तर सुरक्षेच्या बाबतीत भारताने सजग राहायला हवे असेही त्यांनी म्हटले.

शुक्रवार, १५ ऑक्टोबर रोजी नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजया दशमी उत्सव पार पडला. या उत्सवाला सरसंघचालक मोहन भागवत यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी देशासमोर उभ्या असलेल्या अनेक प्रश्नांना हात घातला. यावेळी सुरक्षेच्या मुद्यावरही त्यांनी भाष्य केले. “देशाच्या वायव्य सीमेवर तालिबानचा प्रश्न उभा ठाकला आहे. तालिबान आधी कोण होता हे आपल्याला माहित आहे. तालिबान आपण बदलल्याचा दावा करतो पण आपल्याला त्यावर विश्वास ठेवता येणार नाही. पाकिस्तान आणि चीन आजही तालिबानचे समर्थन करतात. तालिबान जरी बदलला असे मानले, तरी पाकिस्तान बदलला आहे का? चीन बदलला आहे का? असा सवाल भागवत यांनी केला आहे. तर भारताला आपल्या सीमा भागातील सुरक्षा, आंतरिक सुरक्षा, सागरी सुरक्षा आणि आजच्या इंटरनेटच्या युगात राहत असताना सायबर सुरक्षा या सर्वांवर काम करणे गरजेचे असल्याचे भागवत यांनी म्हटले आहे.

यावेळी त्यांनी काश्मीर प्रश्नावर देखील भाष्य केले. नुकतेच सरसंघचालक मोहन भागवत हे जम्मू-काश्मीरचा दौरा करून परतले. त्या बद्दल आपले अनुभव सांगताना ते म्हणाले कलम ३७० हटवण्याचा जम्मू-काश्मीर मधील स्थानिक सामान्य नागरिकांना फायदा होत आहे. तिथले नागरिक आता देशासोबत मनाने सोडले जातील यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. “आम्ही भारतमातेचे पुत्र आहोत, आम्ही भारताचे अंग आहोत ही भावना जम्मू-काश्मीरच्या नागरिकांमध्ये निर्माण करावी लागेल. यासाठी शासन आणि समाज दोन्ही पातळींवर प्रयत्न सुरू आहेत. पण ते वाढायला हवे.” असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा:

महाराष्ट्रातील सरकारी बंद विरोधात उच्च न्यायलायत याचिका

… म्हणून मुंबई पोलीस समीर वानखेडेंना समन्स पाठवणार

नवाब मलिकांच्या जावयाचा जामीन रद्द होणार?

आव्हाडांना हाकला!

कलम ३७० हटवल्यामुळे काश्मीरमधील लोकांना दहशतवाद्यांची भीती वाटणे बंद झाले आहे. त्यांचे संपूर्ण काम हे भीती वरच अवलंबून आहे. त्यामुळे ती भीती पुन्हा आणण्यासाठी त्यांचे कार्य सुरू आहे. आपली भीती पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी टार्गेटेड हिंसाचार अतिरेक्यांच्या मार्फत सुरू आहे. पण त्याचाही बंदोबस्त करावा लागेल असे भागवत म्हणाले.

यावेळी बोलताना मोहन भागवत यांनी हिंदू मंदिरांवर असलेल्या सरकारी नियंत्रणावरही भाष्य केले. देशात हिंदू देवस्थाने सुस्थितीत नाहीत. काही ठिकाणी मंदिरे सरकारच्या अधीन आहेत. काही ठिकाणी मंदिरे भक्तांच्या ताब्यात आहेत. सरकारच्या ताब्यातील काही मंदिरे अतिशय उत्तम प्रकारे सुरू आहेत. तर भक्तांच्या ताब्यातील काही मंदिरेही सुस्थितीत आहेत. पण सर्वत्र ही परिस्थिती नाही. सरकारच्या ताब्यात असलेल्या मंदिरांची जमीन विकली जाते, संपत्ती बळकावली जाते. हिंदूंना आवश्यकता असताना हिंदू मंदिरांच्या संपत्तीचा लाभ अहिंदूंना दिला जातो. या सर्व विषयात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. सर्वोच्च न्यायालय असे सांगते की मंदिरांचा मालकी हक्क हा देवाचाच आहे आणि पुजारी फक्त व्यवस्थापक आहेत. तर सरकार फक्त काही ठराविक कालावधी पुरतेच मंदिरांची व्यवस्थापन आपल्या ताब्यात घेऊ शकते. त्यामुळे या बाबतही ठोस निर्णय घेणे गरजेचे असल्याचे मोहन भागवत म्हणाले.

Exit mobile version