वेदांता-फॉक्सकॉन, टाटा एअरबस यासारखे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने विरोधक शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करत आहेत. त्यामुळे आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. हे प्रकल्प राज्यातून बाहेर का गेले याची चौकशी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ही घोषणा केली आहे.
उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांची समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीमध्ये उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांचा देखील समावेश करण्यात येणार आहे. या समितीद्वारेचं याबाबत चौकशी करण्यात येणार आहे. या समितीद्वारे ६० दिवसांत अहवाल सादर करण्यात येणार आहे. प्रकल्प बाहेर जाण्यामागील कारणे शोधण्यासोबतच दोषारोप सिद्ध करण्याचे काम ही समिती करणार आहे. येत्या काही दिवसांत या समितीतील तज्ज्ञांची नावे जाहीर करण्यात येतील, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे.
हे ही वाचा :
गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यात ८९ जागांसाठी मतदान सुरु
प्रसिद्ध पत्रकार रवीश कुमार यांचा एनडीटीव्हीला रामराम
ISIS चा म्होरक्या युद्धात ठार, नव्या म्होरक्याचं नाव घोषित
अफगाणिस्तानात स्फोटांची मालिका सुरूच; मदरशातील स्फोटाने घेतले १८ बळी
तसेच यावेळी उदय सामंत यांनी महाविकास आघाडीला हे प्रकल्प राज्याबाहेर जाण्यासाठी जबाबदार धरले आहे. उदय सामंत म्हणाले, प्रकल्प राज्यात यावा यासाठी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने कोणेतेही प्रयत्न केले नाहीत. त्यांच्या काळात कंपनीसोबत साधा सामंजस्य करार देखील झाला नाही. त्यामुळे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे हेच यासाठी जबाबदार असल्याचा आरोप उदय सामंत यांनी केला आहे. दरम्यान, राज्य सरकारच्या इतिहासात पहिल्यांदाच अशाप्रकारे समिती स्थापन करून प्रकल्प बाहेर जाण्यामागील कारणे शोधण्यात येणार आहेत.