मुख्यमंत्र्यांच्या नाकर्तेपणामुळे स्थानिक प्रशासन मुजोर- अतुल भातखळकर

मुख्यमंत्र्यांच्या नाकर्तेपणामुळे स्थानिक प्रशासन मुजोर- अतुल भातखळकर

भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी औरंगाबादमधील प्रकारावरून ठाकरे सरकारवर टीका केली आहे. औरंगाबादमध्ये पोलीस मारहाणीतून एका तरुणाची हत्त्या झाली होती. याच प्रकरणावरून भातखळकरांनी टीका केली आहे. औरंगाबादमधील या प्रकारासाठी भातखळकरांनी मुख्यमंत्र्यांचा नाकर्तेपणा आणि पोलिसांची मुजोरी जबाबदार असल्याचे सांगितले आहे.

“मुख्यमंत्र्यांच्या नाकर्तेपणामुळे राज्यात प्रत्येक ठिकाणी स्थानिक प्रशासन मुजोर झाले आहे. केशकर्तनालय उघडे ठेवले म्हणून पोलिसांनी औरंगाबादला प्राण जाईपर्यंत त्या तरुणाला बेदम मारहाण केली. राज्यात अक्षरशः अराजक माजले आहे.” असे ट्विट अतुल भातखळकर यांनी केले आहे.

पोलिसांच्या मारहाणीत औरंगाबादमध्ये सलून व्यावसायिकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत काल उस्मानपुरा पोलीस ठाण्यासमोर मोठा जमाव जमला होता. मात्र आता या घटनेत एक ट्विस्ट निर्माण झाला आहे. कारण परिसरातील सीसीटीव्ही फूटेजमध्ये सलून चालक पोलिसांशी बोलत असतानाच अचानक जमिनीवर कोसळल्याचं दिसत आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याला मारहाण केली की नाही, असा संभ्रम निर्माण झाला आहे.

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण राज्यात १५ दिवसांसाठी संचारबंदीची घोषणा केली आहे. याशिवाय आधीच कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या निर्बंधांनुसार फक्त जीवनाश्यक वस्तूंची दुकानं उघडण्यास मुभा आहे. मात्र या नियमांच्या विरुद्ध जाऊन औरंगाबादेतील सलून व्यावसायिक फिरोज खान यांनी सलून उघडलं.

हे ही वाचा:

राजेश टोपेंना शहाणपण आग लागेपर्यंत का सुचले नाही

‘पोयला बौशाख’ निमित्त पंतप्रधान, राष्ट्रपतींकडून शुभेच्छा

कोरोनाची चेन वाढतच आहे

कडक निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकाचा पोलीस मारहाणीत मृत्यू

सलून उघडल्याची माहिती मिळाल्यानंतर दोन पोलीस कर्मचारी सलूनवर पोहोचले. पोलिसांनी खान यांना बेदम मारहाण केल्याचा दावा केला जात होता. या मारहाणीत सलून व्यावसायिक फिरोज खान यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला होता. दरम्यान, समोर आलेल्या सीसीटीव्ही फूटेजमध्ये पोलीस बोलत असताना सलून चालक अचानक जमिनीवर कोसळल्याचं दिसत आहे. त्यांना परिसरातील नागरिकांनी रुग्णालयात हलवल्याचंही फूटेजमध्ये दिसत आहे. त्यामुळे पोलिसांनी सलून चालकाला मारहाण केली की नाही, असा संभ्रम आता निर्माण होत आहे.

Exit mobile version