पूरग्रस्तांच्या मनाला डागण्या देणारे दौरे करण्यापेक्षा मुख्यमंत्री घरी बसलेले बरे होते…

पूरग्रस्तांच्या मनाला डागण्या देणारे दौरे करण्यापेक्षा मुख्यमंत्री घरी बसलेले बरे होते…

मागील काही दिवस कोकणामध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले होते. अनेक ठिकाणी पूरपरिस्थितीत निर्माण झाली होती, तर काही ठिकाणी भूस्खलन झाले होते. या विविध नैसर्गिक आपत्तीत काही नागरिकांनी दुर्दैवाने आपले प्राण देखील गमावले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी दौरा केला. परंतु त्यांचा दौरा लोकांच्या दुःवर फुंकर घालण्याऐवजी त्यांच्या दुःखावर डागण्या देणारा ठरला आहे. त्यावरून सरकारवर जोरदार टीका देखील केली जात आहे.

आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या चिपळूण दौऱ्यादरम्यान नागरिकांशी अरेरावीचे वर्तन घडल्याप्रकारावरून टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांसोबत आमदार भास्कर जाधव देखील होते. त्यांनी आपले गाऱ्हाणे मुख्यमंत्र्यांसमोर मांडणाऱ्या महिलेवर अरेरावी केल्याचे समोर आले होते. त्यावरून मुख्यमंत्र्यांवर भातखळकरांनी ट्वीटरवरून निशाणा साधला आहे. ट्वीट करताना त्यांनी म्हटले आहे की,

पूरग्रस्तांच्या मनाला डागण्या देणारे दौरे करण्यापेक्षा मुख्यमंत्री घरी बसलेले बरे होते…

मुख्यमंत्र्यांनी पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी चिपळूण शहराला भेट दिली होती. त्यावेळी त्यांच्यासोबत भास्कर जाधव देखील होते. चिपळूण शहरातील व्यथा मांडताना एका महिलेने मुख्यमंत्र्यांसमोर आपले गाऱ्हाणे मांडण्याचा प्रयत्न केला तेव्हा आमदार भास्कर जाधव यांनी या महिलेवरच अरेरावी केली होती. इतकेच नाही, तर या महिलेच्या मुलाला देखील ‘समजव तुझ्या आईला! उद्या भेट’ अशी धमकी देखील दिली.

या महिलेने आमदारांचा, खासदारांचा दोन महिन्याचा पगार द्या असा टाहो देखील फोडला होता. त्यावर आमदार भास्कर जाधव यांनी आमदरांनी खासदारांनी सहा महिन्याचा पगार दिला तरी काही होणार नाही असे देखील म्हटले होते. या वक्तव्यांमुळे त्यांना मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरे जावे लागत आहे.

Exit mobile version