मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात संशयाचे धुके ज्यांच्या भोवती वाढत आहे असे वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे ह्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशस्तीपत्र दिले आहे. वाझे म्हणजे ओसामा बिन लादेन नाहीत असे विधान मुख्यमंत्री ठाकरेंनी केले आहे. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
राज्याचा अर्थसंकल्प समाधानकारक होता असे म्हणत मुख्यमंत्र्यानी राज्याच्या अर्थसंकल्पाचे कौतुक केले. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी मनसुख हिरेन प्रकरणात वादग्रस्त ठरलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या प्रकरणात आपले मत मांडले. राज्यात मृत्यू झाला की त्याची दखल सरकारला घ्यावीच लागते. मग ती हत्या असो वा आत्महत्या असे मुख्यमंत्री म्हणाले. जसे मनसुख हिरेन प्रकरण आहे तसेच डेलकर प्रकरणही आहे. त्यात सुसाईड नोट सापडली आहेत ज्यात काही लोकांची नावे आहेत.
हे ही वाचा:
आधी फाशी देऊन मग तपास
राज्य सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही. पण आधी फाशी देऊन नंतर तपास करायचा अशी तपासाची पद्धत नाही असू शकत असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. त्यांचा रोख सचिन वाझे यांना लक्ष्य करणाऱ्यांकडे होता. “तपासाची एक पद्धत असते. आधी फाशी द्या आणि नंतर तपास करा असं होऊ शकत नाही. कोणत्याच सरकारमध्ये नाही होऊ शकत. ही नवीन पद्धत आलेली आहे. आधी एखाद्याला टार्गेट करायचं. त्याच्या अब्रूचे धिंडवडे काढायचे आणि नंतर तो त्या प्रकरणात नाहीच हे सिद्ध झाले तर?” असा सवाल उपस्थित करत एक प्रकारे मुख्यमंत्र्यांनी वाझे यांची पाठराखण करायचा पुन्हा एकदा प्रयत्न केला.
सचिन वाझे म्हणजे ओसामा बिन लादेन नाहीत.
“राज्यात सचिन वाझे म्हणजे जणू काही ओसामा बिन लादेन आहेत असे चित्र रंगवले जात आहे. पण सरकारने वेळोवेळी सांगितले आहे की या प्रकरणाचा तपास सुरु आहे. तपासातून जे काही समोर येईल त्यानुसार कारवाई केली जाईल. सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही.” असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सचिन वाझेला लटकवण्याचा प्रयत्न होतोय का? असाही प्रश्न विचारला. मुख्यमंत्र्यांनी याचा संबंध अर्णब गोस्वामी याच्या अटकेशी जोडला आहे.