महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्यातील प्रमुख नेत्यांचे शिष्टमंडळ महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात ही भेट घेतली जाणार आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारताचे महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहिले आहे. हे पत्र राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे सुपूर्त केले जाणार आहे. त्यामुळे राजभवनाच्या लॉनवरून मराठा आरक्षणाचा चेंडू दिल्लीच्या दिशेने टोलवला जाणार आहे. त्यामुळे आता राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण पेटण्याची चिन्ह दिसू लागली आहेत.
मराठा आरक्षणाच्या संदर्भात महत्वाचा निर्णय देत सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला दिलेले आरक्षण घटनाबाह्य ठरवले. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकवायला अपयशी ठरलेल्या ठाकरे सरकारने हा निर्णय आल्यापासूनच जबाबदारीतून हात झटकत केंद्र सरकारच्या अंगावर गोष्टी ढकलायला सुरवात केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधत मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे अशी रड सुरु केली. त्यासंबंधी आपण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहिणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
हे ही वाचा:
ठाकरे सरकारने अर्णब, कंगनाशी लढण्यात घालवले दीड वर्ष
ठाकरे सरकारने अर्णब, कंगनाशी लढण्यात घालवले दीड वर्ष
अहमदनगरमधील लॉकडाऊन ५ दिवसांनी वाढवला
सामनाचा अग्रलेख म्हणजे खाली डोकं वर पाय
मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना उद्देशून पत्र लिहिले आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या माध्यमातून हे पत्र राष्ट्रापती रामनाथ कोविंद यांना पाठवले जाणार आहे. त्यामुळे ‘राज्यपालांचे निवासस्थान म्हणजे राजकारणाचा अड्डा आहे’ असे टोमणे मारणाऱ्या ठाकरे सरकारचे मुख्यमंत्री आता त्याच राज्यपालांना भेटायला जाणार आहेत. मंगळवार, ११ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्यातील प्रमुख नेत्यांचे शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार आहे. संध्याकाळी ५ वाजता राजभवनात ही भेट होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण उपसमिती अध्यक्ष अशोक चव्हाण, दिलीप वळसे पाटील, बाळासाहेब थोरात हे नेते राज्यपालांची भेट घेणार आहेत. दरम्यान राज्य मंत्रिमंडळातील काही मंत्री राजभवनावर दाखल झाले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थोड्याच वेळात तिथे पोहोचणार असल्याची माहिती मिळत आहे.