स्वातंत्र्यदिनाच्या भाषणाला कोरोनाची लागण

स्वातंत्र्यदिनाच्या भाषणाला कोरोनाची लागण

कोरोना, लॉकडाउन, लसीकरण हेच मुद्दे मुख्यमंत्र्यांच्या भाषणात

देशाचा आज ७५वा स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना महाराष्ट्राच्या वाटचालीऐवजी कोरोनाचाच विषय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून ध्वजवंदनानंतर ऐकायला मिळाला. निदान स्वातंत्र्यदिनी महाराष्ट्राची प्रगती, महाराष्ट्राचे व्हीजन, आगामी काळातील योजना, सरकारच्या मनात असलेला महाराष्ट्र याविषयी नागरिकांना ऐकायला मिळणे अपेक्षित होते. लोकांना काहीतरी कोरोनाच्या काळात दिलासा मिळेल अशी घोषणा होईल, अशी अपेक्षा होती. पण त्याऐवजी कोरोना आणि लॉकडाउन हेच मुद्दे केंद्रस्थानी राहिले.

देशाच्या सद्यस्थितीविषयी नसेल तरी निदान महाराष्ट्राच्या स्थितीविषयी बोलणे त्यांच्याकडून अपेक्षित होते. पण त्यातही कोरोनाची भीती कशी वाढते आहे, त्याविषयी सावधगिरी बाळगली नाही तर पुन्हा लॉकडाऊन लावावा लागेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. स्वातंत्र्यदिनी लोकांच्या पायात पुन्हा बेड्या घालण्याचाच हा इशारा दिला गेला असे म्हणता येईल.
या भाषणात मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोनाचे निर्बंध शिथिल केले आहेत, पण नियमांची अंमलबजावणी लोकांनी केली नाही तर पुन्हा निर्बंध लावावे लागतील. एरवीही फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून मुख्यमंत्री कोरोनासंदर्भात सांगत असतातच निदान स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या आगामी वाटचालीविषयी मार्गदर्शनाची अपेक्षा होती. पण अशा कोणत्याही मुद्द्याला मुख्यमंत्र्यांनी स्पर्श केला नाही. त्यांनी राष्ट्रपती पदकप्राप्त पोलिसांचे कौतुक केले, पण त्या पलीकडे जात त्यांच्या भाषणात स्वातंत्र्यदिनाचे वैशिष्ट्य कुठेही झळकले नाही.

कोरोना वगळता कोणताही विषय सध्या नाही, असाही त्यांच्या भाषणाचा रोख होता. ते सांगतानाच कालच राज्याने एकाच दिवशी साडेनऊ लाख लसीकरण करून उच्चांक प्रस्थापित केल्याचेही ते म्हणाले. केंद्राकडून लसी उपलब्ध होत नाहीत, असा सातत्याने आरोप एकीकडे राज्यातील सत्ताधारी नेते करत असतात, पण मुख्यमंत्र्यांनी या भाषणाच्या निमित्ताने केंद्राकडून लसी उपलब्ध होत आहेत आणि त्या आधारावर एकाच दिवशी सर्वाधिक लसीकरण झाल्याचे मान्य केले.

अमृतमहोत्सव की हिरकमहोत्सव?

सकाळी ध्वजवंदन झाल्यानंतर भाषणात स्वातंत्र्यदिनाचा अमृतमहोत्सव की हिरकमहोत्सव असा मुख्यमंत्र्यांचा गोंधळ उडाला. त्याची तर प्रचंड चर्चा सोशल मीडियात झाली. इतक्या दिवसांपासून आपण स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्धापनदिनाविषयी चर्चा करतो आहोत, सगळ्या देशभरात आपण ७५व्या स्वातंत्र्यदिनाचे वातावरण आहे. पण मुख्यमंत्र्यांना मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याकडून हे स्वातंत्र्याचे कोणते वर्ष आहे, हे जाणून घ्यावे लागले. मागे उभ्या असलेल्या मुख्य सचिव कुंटे यांनी त्यांना हा अमृतमहोत्सव असल्याचे सांगितले. यावर सोशल मीडियात चांगलीच खिल्ली उडविली गेली.

हे ही वाचा:

अफगाणिस्तानात सत्तांतर होणार?

सावधान! इथे बिबट्या आहे

दक्खनच्या राणीला विस्टाडोमचा मुकुट

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव की हिरक महोत्सव? उद्धव ठाकरेंचा गोंधळ

एरवी निवडणुका किंवा एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने भाषण करताना त्याची तयारी करावी लागते. आपल्याला कोणत्या मुद्द्यांवर बोलले पाहिजे, कोणत्या मुद्द्यांना स्पर्श केला पाहिजे, कोणते संदर्भ दिले पाहिजेत, ही वक्त्याची तयारी असली पाहिजे. मग स्वातंत्र्यदिनी भाषण करताना असाच थोडा अभ्यास, तयारी आवश्यक नाही का? असा प्रश्न सर्वसामान्यांकडून विचारण्यात आला. आपण ७५वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना देशाची सद्यस्थिती काय आहे, देशाची कशी प्रगती सुरू आहे हे दिल्लीतील लाल किल्ल्यावरून भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. त्यांनी देशाच्या प्रगतीचा समग्र आढावा घेतला. समाजातील विविध घटकांच्या प्रगतीचा, त्यांच्यासाठी आणलेल्या योजनांचा ताळेबंद मांडला. तीच अपेक्षा मुख्यमंत्र्यांकडून होती.

Exit mobile version