महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी, मुंबई येथे झालेल्या धुवाधार पावसाचा आढावा घेतला आहे. तो पण अवघ्या केवळ पाच मिनिटाच्या धावत्या भेटीत. मुख्यमंत्र्यांची ही धावती भेट रेकॉर्डब्रेक करणारी ठरली असून तीन तासाच्या गाजलेल्या ‘वादळी’ कोकण दौऱ्याचे रेकॉर्ड या पाच मिनिटांच्या धावत्या आढावा भेटीने मोडले आहे.
बुधवार, ९ जून रोजी पहाटेपासूनच मुंबईत धो धो पाऊस कोसळू लागला हा पाऊस म्हणजे मान्सूनपूर्व सरी असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले असले तरीही या पहिल्याच पावसात मुंबापुरीचे तुंबापुरी झालेली पहायला मिळाली. शहराच्या अनेक भागात दरवर्षीप्रमाणे पाणी साचून जनजीवन विसकळीत झाले. सायन गांधी मार्केट, हिंदमाता, किंग्स सर्कल, वडाळा अशा मुंबईच्या अनेक भागात धुवाधार पावसामुळे पाणी तुंबले होते. यामुळे वाहतूक विस्कळीत होऊन गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. तर रेल्वेमार्गावर पाणी साचून मध्यरेल्वेचीही वाहतूक विस्कळीत झालेली पाहायला मिळाली. ठाणे ते छत्रपती शिवाजी महाराज स्थानकापर्यंतची रेल्वेसेवा ही बंदही करण्यात आली.
हे ही वाचा:
सेलिब्रिटीजच्या मुंबई प्रेमावर नितेश राणे बरसले
काँग्रेसला मोठा धक्का; जितिन प्रसाद भाजपात
मुळशीमधील कंपन्यांत घुसून पाहणी करु
ठाकरे सरकारची निष्क्रियता; अस्मिता योजनेचा उडाला बोजवारा
या साऱ्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बुधवारी संध्याकाळी मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षात जाऊन पोहोचले. तिथे मुख्यमंत्र्यांनी धुवाधार पावसामुळे मुंबईत निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी मुख्यमंत्र्यांना एकूण परिस्थिती आणि महापालिकेच्या उपाययोजना यासंबंधीची माहिती दिली. पण गेले कित्येक तास कोसळणाऱ्या आणि मुंबईचे जनजीवन विस्कळीत करणाऱ्या या पावसाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी अवघ्या ५ मिनिटांतच घेतला आणि आपला हा दौरा आटोपता घेतला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या सुपरफास्ट दौऱ्यावर टीकेची झोड उठली असून हा दौरा म्हणजे केवळ एक औपचारिकता असल्याचे म्हटले जात आहे.